Lunch Date : “हिरव्या मिरचीचा सौम्य झटका”

167

>> शेफ विष्णू मनोहर

गीतकार, चित्रकार मिलिंद जोशी या शाकाहारी, सात्त्विक माणसाला जेवणात हिरव्या मिरचीची जोड लागते.

मिलिंद जोशी एक वेगळ्या धाटणीचा कलाकार, मित्र. तो मुळात चित्रकार आहे. त्याचबरोबर छान कविता करतो, गीतकार आहे. जवळपास 40च्या वर मालिकांना संगीत दिले. बरेच चित्रपट, गाणी त्याच्या नावावर आहेत. त्याची माझी खरी ओळख नागपूर ते मुंबई विमान प्रवासात झाली, तेव्हा ठरवलं हा मैत्री करण्यासारखा मनुष्य आहे. एक दिवस त्याला आपल्या डिनर डेटबद्दल विचारल्यावर तो आनंदाने तयार झाला. ठरलेल्या वेळेप्रमाणे आम्ही पुण्यातील एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलो. व्हेज रेस्टॉरंट यासाठी की, तो स्वतः शाहाकारी आहे. नाही म्हणायला त्याला अंडं चालतं. अंडय़ामध्ये वेगवेगळे प्रकार तो करून खातो. जेवण मात्र त्याला थोडं चमचमीत आणि तिखट लागतं. बरोबर हिरवी मिरची असली तर उत्तम.

उपवासाची खिचडी, त्याबरोबर भाजलेली हिरवी मिरची आणि दाण्याची चटणी हा त्याचा विशेष आवडीचा प्रकार. त्याचबरोबर रोल्सचे सर्व प्रकार त्याला आवडतात. त्यातल्या त्यात सुरळीची वडी, बाकरवडी, अळूवडी हे सर्व प्रकार विशिष्ट वेळीच त्याला खायला आवडतात. स्वतःला त्याला तसं बनवायला आवडत नाही, पण अंडी आवडत असल्यामुळे घरी कधी कधी अंडा करी करतो. एकदा बायको प्रयोगावरून उशिरा येणार होती. तिने घरी भाजी तयार करून ठेवली होती. मी तिला इम्प्रेस करावं म्हणून वरण, भात आणि पोळ्या बनविण्याचा निर्णय घेतला. वरण-भाताचं तर ठीक आहे, पण पोळ्यांचं काय करायचं? हा यक्षप्रश्न होता. निर्णय घेतल्यानंतर कणिक भिजवण्यापासूनची तयारी तुमच्या यूटय़ूबवरून शिकलो. बायको घरी आल्यावर तिने एकूण प्रकार पाहिला. पहिल्यांदा चेहरा क्लासिक होता, पण नंतर मात्र प्रेमाने हसून तिने पोळ्यांचा स्वीकार केला.

घरी आम्ही कामं वाटून घेतली आहेत असे तो म्हणाला. स्वयंपाक सोडून बाकी सर्व कामे मी करतो, पण आता हळूहळू स्वयंपाकाकडेसुद्धा वळू लागलो आहे. त्याच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाला किती वेळ देतो असं विचारल्यावर तो म्हणाला की, संगीतकार म्हणून काम सुरू केल्यानंतर ती दिवसभरच्या शेडय़ुलिंगमध्ये जेवणाला वेळ उरायचाच नाही, पण दुपारी दोनच्या सुमारास भूक लागल्यावर काही मागवून घेऊ असा विचार करून रेकॉर्डिंग सुरू केलं. पण दोन वाजता जेवण मागविल्यावर ते तीन साडेतीनला आलं, पोटात भुकने कावळे ओरडतं होते. आणि चिडचिड झाल्यामुळे कामातही लक्ष लागत नव्हतं. त्यानंतर कानाला खडा लावला! की रेकॉर्डींगच्या दिवशी दोन ते तीन ही वेळ जेवणासाठी राखीव ठेवायची आणि आधीपासून जेवणाचा व्यवस्था करायची. मिलिंदला स्वतःला असं वाटतं की जेवताना कोणतेही विचार मनात न आणता पदार्थांशी बोलत-बोलत जेवणावर ताव मारावा, त्याने ते अन्न पचनही पडतं आणि जेवणाची मजा घेता येते. जेवायला जायला कुठे आवडतं असं विचारल्यावर तो म्हणाला ऐसपैस रेस्टॉरेंट, मंद संगीत, कमी बोलणारा स्टाफ आणि घरगुती वातावरण जिथे असेल अशा ठिकाणी मला जेवायला जाणं आवडतं. बोलता-बोलता मी त्याला म्हटलं की मलाही जेवायला एकदा बोलाव. तर तो आनंदाने तयार झाला आणि लगेच मेनू पण सांगितला. तो म्हणाला, मला सूप बनवायला फार आवडतं आणि बायकोकडून सॅलड व दाल फ्राय बनवून घेईल. अशी भविष्यातल्या जेवणाची तरतूद करून मिलिंद बरोबरची डिनर डेट चक्क दोन तासांनी संपली.

एग लॉलीपॉप

साहित्य – सूप स्टीक्स 8-10 नग, बटाटे 50 ग्रॅम, उकडलेली अंडी 5 नग, कॉर्नस्टार्च 100 ग्रॅम, आलं-लसूण 10 ग्रॅम, अजिनोमोटो 10 ग्रॅम, रेड ऑरेंज रंग 10 ग्रॅम, तेल तळाण्याकरिता, बारीक चिरलेला लसूण 20 ग्रॅम, टोमॅटो सॉस 50 ग्रॅम.

कृती – उकळलेले बटाटे व अंडी कुस्करून मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्यात बारीक केलेले आलं, लसूण, मीठ, कॉनस्टार्च घालून चांगले मळून घ्यावे. या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन सूप स्टीक्सवर लावून घ्यावा व याला मध्यम आचेवर डीपफ्राय करावे. असे तयार केलेले लॉलीपॉप सर्व्ह करतेवेळी फ्रायपॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण, टोमॅटो सॉस घालावा. हे मिश्रण तयार लॉलीपॉप घालून सलाडसोबत खायला द्यावे.

फ्रुट सॅलड
साहित्य – पपई 1 वाटी, अनननस 1 वाटी, चिकू 1 वाटी, केळी 1 वाटी, द्राक्षे 1 वाटी, काजू, खिसमीस अर्धी वाटी, मँगो पल्प 2 वाटया, फ्रेश क्रीम 2 वाटया, साखर दीड वाटी, व्हॅनीला ऑईस्क्रीम 2 वाटया.

कृती – सर्व प्रथम क्रीम, साखर, मँगो पल्प एकत्र करुन त्यामध्ये काजू, किसमीस धुवून भिजत ठेवा. सर्व फळे चिरुन त्यात घाला. वरुन व्हॅनीला आईस्क्रीम टाकून थंड करा नंतर सर्व्ह करा.

अंडा करी
साहित्य – आलं-लसूण पेस्ट 1 वाटी, कांद्याची पेस्ट 1 किलो (कांदे तळून त्याची पेस्ट बनवावी), खसखस भिजवून, भाजून केलेली पेस्ट 2 चमचे, नारळ भाजून तयार केलेली पेस्ट 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे, धणे पावडर अर्धा चमचा, जीरे पावडर अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, तमालपत्र 2-3 नग, तेल 200 ग्रॅम.

कृती – फ्रायपॅनमध्ये तेल घेऊन त्यात जीरे घालावे, जीरे फुटल्यावर आलं-लसूण पेस्ट घालावी, थोडी परतल्यावर त्यात कांद्याची पेस्ट, खसखस आणि नारळाची पेस्ट घालावी व तेल सुटेस्तोवर परतावे. नंतर त्यात अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जीरे पावडर, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि 2-3 तमालपत्र टाकून थोडे पाणी मिसळवावे आणि पुन्हा त्याला तेल सुटेस्तोवर परतावे. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आणि उकळलेले अंडे घालून 5-10 मिनिटे शिजवावे.

आपली प्रतिक्रिया द्या