ठाणे-पालघरमध्ये हत्तीरोगाने 971 जणांना घेरले, डासांपासून सावधान!

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे, पालघरवासीयांसाठी एक धोक्याची घंटा घणघणू लागली आहे. या दोन्ही जिह्यांतील ग्रामीण भागात हत्तीरोगाने डोके वर काढले आहे. महाराष्ट्राच्या 17 जिह्यांत हत्तीरोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून ठाणे व पालघर जिह्यात या रोगाची तब्बल 971 जणांना लागण झाल्याची आकडेवारी सरकारनेच जाहीर केली आहे. क्युलेक्स जातीच्या डासाची मादी चावल्यामुळे या रोगाचा फैलाव होत असल्याने ठाणेकरांनो डासांपासून सावधान, असा इशाराच डॉक्टरांनी दिला आहे.

हत्तीरोगाने डोके वर काढल्याने सरकारने रुग्णांची शोधमोहीम हाती घेतली. त्यात 2017 च्या आकडेवारीनुसार राज्यात 40 हजार 204 रुग्ण आढळले. धक्कादायक बाब म्हणजे त्यात ठाणे व पालघर जिह्यातील काही गावे व शहापूर आणि अंबरनाथ या शहरांचा समावेश आहे. यामध्ये 971 रुग्णांचा समावेश आहे. गडचिरोलीतही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. या रोगाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला असून त्यासाठी 27 ते 31 ऑगस्ट या कालावधीत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात आली आहे.

हत्तीरोगाबद्दल आणि त्याबाबतच्या औषधोपचाराबाबत समाजात जागरुकता नसल्यानेच अनेकवेळा लोक औषधे घेत नाहीत. त्यामुळे रोग बळावतो. पर्यायाने सरकारच्या सामुदायिक औषधोपचार मोहिमेला धक्का बसतो. त्यामुळे औषधे वेळेवर घेत राहा आणि फिट राहा. – डॉ. शशिकांत जाधव, सहसंचालक, मलेरिया आणि हत्तीरोग निर्मूलन.

  • लिम्फाटिक फिलेरियासिस ऊर्फ हत्तीरोग हा महाराष्ट्रासह देशाच्या 21 राज्यांची गंभीर समस्या बनली आहे.
  • राज्यात लिम्फोएडिमाचे 40 हजार 204 रुग्ण आहेत.
  • ठाणे-पालघरमध्ये 971 रुग्ण आढळले आहेत.
  • सरकारने सामुदायिक औषधोपचार मोहिमेद्वारे 17 जिह्यांपैकी 10 जिह्यांत संसर्गाची पातळी कमी केल्याचा अहवाल आहे.