करुणानिधी अत्यवस्थ, पुढील २४ तास महत्त्वाचे

सामना ऑनलाईन । चेन्नई

प्रदीर्घ काळापासून आजारी असलेले द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी (९७) यांच्यावर सध्या कावेरी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत प्रार्थना करण्यात येत असतानाच रुग्णालयाने एक मेडिकल बुलेटीन जारी केली आहे. ‘द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांची तब्येत गंभीर असून पुढील २४ तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत,’ असे मेडिकल बुलेटीनद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुत्रमार्गात संसर्ग झाल्याने त्यांना चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी उपचारांना साथ दिली होती. परंतु सोमवारी अचानक त्यांची तब्येत अत्यवस्थ झाली.

दरम्यान, करुणानिधी यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यापासून ते आतापर्यंत २१ कार्यकर्त्यांचा या धक्क्याने मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत द्रमुक नेते आणि करुणानिधी यांचा मुलगा एम.के. स्टालिन याने दु:ख व्यक्त केले.