माळढोक

अनंत सोनवणे

खास माळढोक पक्ष्यांचे नान्नज येथील अभयारण्य

एखाद्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेले अभयारण्य हा हिंदुस्थानच्या दृष्टीने काहिसा दुर्मिळ योग; परंतु महाराष्ट्रात हा दुर्मिळ योग अवतरला १९७९  साली. सोलापूर आणि नगर जिह्यातला गवताळ अधिवास मिळून एक अभयारण्य निर्माण करण्यात आलं. माळढोक नावाच्या एका पक्ष्याच्या संरक्षणासाठी! त्याचं नाव माळढोक पक्षी अभयारण्य. महाराष्ट्रातलं सर्वांत मोठं अभयारण्य, मात्र परिसरातल्या शेतकऱयांच्या वाढत्या तक्रारींमुळे हे क्षेत्र कमी कमी होत गेलं आणि आता ते उरलंय अवघं ३६६ चौ.कि.मी. सोलापुरातल्या नान्नज इथे पक्षीप्रेमी या माळढोकचं दर्शन होईल या आशेने येत असतात. साधारणतः ३० ते ३५ सें.मी. उंचीचे गवत आणि मध्ये काही ठिकाणी अधिक उंचीचे गवत असलेला भूभाग माळढोकसाठी आदर्श अधिवास असतो. १९८० च्या दशकात हिंदुस्थानात दीड ते दोन हजार माळढोक होते. पण अधिवास नष्ट होत गेले आणि ही संख्या घटत गेली. आजच्या घडीला हिंदुस्थानात जेमतेम २५० च्या आसपास माळढोक शिल्लक असतील.

मोठय़ा शरीरामुळे शहामृगासारखा दिसणारा माळढोक (Great Indian Bustard) हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानात आढळणारा एक अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. उडू शकणाऱया पक्ष्यांमध्ये माळढोक हा सर्वांत वजनदार पक्षी मानला जातो. एका नराच्या अनेक माद्या असतात आणि तो आपल्या क्षेत्राच्या हद्दीचं आक्रमकपणे रक्षण करतो. प्रजनन काळात नर विशिष्ट नृत्य करून मादीला आकर्षित करतो. मादी एका विणीच्या हंगामात केवळ एक अंडे देते. पिलू स्वतंत्र होईपर्यंत म्हणजे सुमारे एक वर्ष ती एकटीच त्याचं संगोपन करते. त्यात नराचा सहभाग नसतो. अंडे उबवणीचे २५ दिवस आणि उडायला येईपर्यंतचे ७५ दिवस असे सुमारे १०० दिवस पिल्लांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे असतात. साधारणतः ५० टक्के पिले याच काळात मृत्युमुखी पडतात आणि केवळ २५ टक्के पिले प्रौढत्वापर्यंत जगतात. त्यामुळेच माळढोकची संख्या वाढण्याला मर्यादा येतात.

maaldhok2

याबरोबरच अधिवासाचं क्षेत्र झपाटय़ानं कमी होतं हेही माळढोकाची संख्या घटण्याचं प्रमुख कारण आहे. एका बाजूला गवताळ माळराने शेतीखाली येऊ लागली, तर दुसऱया बाजूला आपल्या शेतात माळढोक दिसला तर आपली शेतजमीन अभयारण्यात जाईल या भीतीने शेतकरी त्याला शत्रू मानू लागले. त्यामुळे माळढोक पक्ष्यांची संख्या कमी कमी होत गेली.

नान्नज अभयारण्यात माळढोकव्यतिरिक्त लाजरी पाणकोंबडी, पिपिट, चंडोल, रानलावा, खाटीक इत्यादी पक्षी पाहायला मिळतात.

स्वतःच्या वाहनाने अभयारण्यात भटकता येतं. काही वाटांवर वनविभागच्या गाईडला सोबत घेऊन निसर्ग निरीक्षण करत फिरता येतं. सोबत दुर्बीण असणं अत्यंत महत्त्वाचं आणि अर्थातच शोधक नजर. कुणी सांगावं तुमचं नशीब जोरावर असेल तर या पृथ्वीतलावरून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला दुर्मिळ माळढोक तुम्हाला दर्शन देऊन जाईल.

माळढोक (नान्नज)

वन्य जीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…माळढोक

जिल्हा…सोलापूर, राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…३६६ चौ.कि.मी.

निर्मिती…१९७९

जवळचे रेल्वे स्थानक 

सोलापूर (२२ कि.मी.)

जवळचा विमानतळ…पुणे (२५० कि.मी.)

निवास व्यवस्था 

सोलापूरला खासगी हॉटेल्स

सर्वाधिक योग्य हंगाम…

ऑगस्ट ते जानेवारी

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही.