लेख : अवकाश सुरक्षिततेचा विचार


>>मच्छिंद्र ऐनापुरे<<

औषधांची निर्मिती करताना जशी एथिक्स कमिटीची व्यवस्था करण्यात आली आहे तशी व्यवस्था किंवा प्रोटोकॉल अवकाश कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत बनवण्याची आवश्यकता आहे. आपल्या इथे ग्रीन ट्रिब्युनल आहे तसेच काहीतरी जागतिक स्तरावर बनवण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण असे समजत आलो आहोत की, जर धरती सुरक्षित नाही तर आपणदेखील सुरक्षित नाही, पण आता अवकाश सुरक्षिततेचा विचार करणे आपल्या सुरक्षिततेसाठी क्रमप्राप्त आहे.

माणूस जिथं जिथं गेला आहे तिथं तिथं त्याने केरकचरा नेला आहे. मनुष्यधर्मानुसार त्याने घराचा केरकचरा तर केला आहेच, पण दुसऱ्याच्या घराचे अंगणदेखील स्वच्छ ठेवलेले नाही. घरादारात कचरा ठेवून मजेत जगणारा हा जगातला एकमेव प्राणी असावा. नदीनाले, समुद्रच काय पर्वत-डोंगरसुद्धा सोडले नाहीत. जिथे जाईल तिथे कचरा नेला आहे.  आता माणूस अवकाशातही कचरा सोडून येत आहे. हीदेखील एक मोठी समस्या बनली आहे.

मानवाने त्याच्या विकासचक्रात कचऱ्याचेदेखील रूप पालटवले आहे. शहरात, महानगरात तर केरकचरा आणि त्याचा निपटारा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. प्लॅस्टिकचा कचरा ही एक मोठी समस्या आहे, जी कधी नष्ट होण्याचे नावच घेत नाही. त्याने नदीनाल्यांमध्ये मोठी समस्या निर्माण केली आहे. समुद्रदेखील त्याच्यापासून सुटलेला नाही. त्यामुळे समुद्रातले जीवजंतू, समुद्री सस्तन प्राणी यांचा जीव धोक्यात आला आहे. समुद्राच्या काठाला असे जीव मरून पडलेले आपल्याला वारंवार दिसून येत आहेत.

गिर्यारोहक आपल्यासोबत प्लॅस्टिक व अन्य कचरा घेऊन जात आहेत. मात्र येताना ते तिथेच टाकून माघारी परतून येत आहेत. त्यामुळे या भागातदेखील केरकचरा गंभीर रूप घेत आहे. आता त्यामुळे एव्हरेस्ट शिखराचे नामकरण कचराकुंडी असे झाले आहे. अर्थात याचे धोके लक्षात येऊ लागल्याने यावर उपाययोजना केल्या जात आहेत. नेपाळ सरकारने यावर एक चांगला पर्याय काढला आहे. गिर्यारोहकांच्या वस्तूंची यादी केली जाते आणि ते पुन्हा परत आले की, त्या वस्तू तपासल्या जातात. प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, ऍल्युमिनियमचे कॅन, सिगरेटची पाकिटे, डबे यादीनुसार आहेत का हे पाहिले जाते. या सर्व वस्तू परत आल्या नसतील तर त्या गिर्यारोहकांना दंड भरावा लागतो, पण त्यामुळेदेखील परिस्थिती सुधारताना दिसत नाही. पृथ्वीवरची ही केरकचऱ्याची समस्या जटील बनत चालली असताना आता वैज्ञानिकांना अवकाशातील वाढत्या कचऱ्याची चिंता सतावू लागली आहे. हा ‘स्पेस जंक’ धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे.

अवकाशातल्या केरकचऱ्याला स्पेस जंक म्हटलं जातं. हा दोन प्रकारचा असतो. एक आहे तो वेगवेगळय़ा प्रकारच्या उल्कांमुळे बनला आहे, ज्याला नैसर्गिक कचरा म्हणतात. दुसरा आहे तो मानवनिर्मित आहे. म्हणजे लहानमोठी वेगवेगळय़ा प्रकारची रॉकेटस्, वेळोवेळी अवकाशात सोडण्यात आलेले उपग्रह. ज्यांचे आयुष्य संपले आहे असे उपग्रह अवकाशातच पृथ्वीभोवती चकरा मारत आहेत. उपग्रहापासून वेगळे झालेले, तुटलेले भागदेखील असेच अंतराळी फिरत आहेत. मागे चीनने अवकाशात दोन उपग्रहांची धडक लावण्याचा प्रयोग केला होता. त्यातून ते ग्रह जळून राख झाले, पण ती राख तशीच वातावरणाच्या कक्षेत फिरत आहे. काही धातूंचे तुकडे विखुरले गेले आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित या कचऱ्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. उल्कांपासूनचा कचरा हा सूर्याभोवती फिरत आहे, तर मानवनिर्मित कचरा हा पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत आहे. यातले काही पृथ्वीच्या कक्षेत येऊन भरकटतात. हे तुकडे त्यांच्या मार्गात येणाऱ्या उपग्रहांना किंवा अवकाशयात्रींना धडकल्यास काय अनर्थ ओढवू शकेल याचा अंदाज नाही. या कचऱ्याचा जो वेग आहे तो ताशी 17 हजार मैल असा आहे. म्हणजे बंदुकीतून निघणाऱ्या गोळीपेक्षा सुमारे 22 पट अधिक वेग त्याचा आहे.

नैसर्गिक उल्कापातातून निघणारा कचरा हा पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर घर्षणाने जळून खाक होतो. मात्र मानवनिर्मित उपग्रह अनेक धातूंच्या मिश्रणातून बनलेला असतो. तो घर्षण प्रक्रियेला दीर्घकाळ तोंड देऊ शकतो. अमेरिकेची अवकाश एजन्सी ‘नासा’च्या एका अंदाजानुसार अशा कचऱ्याचे पाच लाखांहून अधिक तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यापासून कशी मुक्तता मिळवायची याची कल्पना कुणालाच नाही. त्यामुळे आता सर्वांनीच अवकाशात उपग्रह सोडताना त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करायचे यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. औषधांची निर्मिती करताना जशी एथिक्स कमिटीची व्यवस्था करण्यात आली आहे तशी व्यवस्था किंवा प्रोटोकॉल अवकाश कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत बनवण्याची आवश्यकता आहे. आपल्या इथे ग्रीन ट्रिब्युनल आहे तसेच काहीतरी जागतिक स्तरावर बनवण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण असे समजत आलो आहोत की, जर धरती सुरक्षित नाही तर आपणदेखील सुरक्षित नाही, पण आता अवकाश सुरक्षिततेचा विचार करणे आपल्या सुरक्षिततेसाठी क्रमप्राप्त आहे.