भाग्य रेषा नसलेला टेलर… ‘तो’ पायानेच करतो शिलाई

2

सामना ऑनलाईन । हरयाणा

‘भाग्य तर त्यांचंही असतं ज्यांना हात नसतात’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. हरयाणात असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका दिव्यांग व्यक्तीने आपल्या परिस्थितीवर जिद्दीच्या जोरावर मात करत आपल्यामधील कलागुणांना वाव दिला आहे. हात नसणारा हा पुरुष शिलाई काम करून आपलं जीवन चालवतो.

हरयाणातील फतेहाबादमध्ये मदन लाल नावाच्या व्यक्तीला जन्मत:च दोन्ही हात नाहीत. मात्र यामुळे खचून न जाता त्यांनी आपला नित्यक्रम चालू ठेवला. आपल्या पायाच्या सहाय्याने ते दररोजची असंख्य कामे अगदी सहजपणे करतात.

मदन लाल यांना जेव्हा कळलं की आपण जातीनं शिंपी आहोत, तेव्हा त्यांनी शिलाईचा व्यवसाय सुरू केला आहे. कपडे शिवण्यासाठी आलेल्या लोकांचं मोजमाप घेणं यासारखी शिवणकामासाठी करावी लागणारी सर्व कामं ते आपल्या पायानेच उत्तम प्रकारे करतात. आता त्यांचा हा व्यवसाय इतका जोमात चाललाय की त्यांच्या हाताखाली गावातील पाच- सात तरूणांना ते शिलाईचं प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे साऱ्या गावाला त्यांच्या अभिमान वाटतोय.