टीम इंडियाला हवा सलामीला विजय; माजी अष्टपैलू क्रिकेटर मदनलाल यांचे मत

77

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

यंदा खेळवल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणारा हिंदुस्थानी संघ निश्चितच बलवान आहे. पण संघाच्या या स्पर्धेतील वाटचालीचे भवितव्य सलामीच्या लढतीतील यशावर अवलंबून असेल. कारण पहिल्याच लढतीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघाशी झुंजावे लागणार आहे, असे मत हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू मदनलाल यांनी व्यक्त केले आहे.

हिंदुस्थानी संघ समतोल आणि बलवान आहे. पण 5 जूनला होणाऱ्या पहिल्या लढतीत यश मिळाल्यास आपल्या संघाचे मनोधैर्य उंचावेल आणि पुढील लढतींत संघाची कामगिरी अधिकच बहरेल असे सांगून मदनलाल म्हणाले, आपल्या संघात अनेक मॅचविनर गोलंदाज आहेत जे एकहाती संघाला विजय मिळवून देऊ शकतात, पण स्पर्धेत सुरुवात विजयाने झाली तर संघाच्या यशाची लय कायम राहू शकते.

सुरुवातीच्या चार लढती जिंकणे आवश्यक
यंदाच्या विश्वचषकात सर्व संघांना एकमेकांशी एकदा झुंजावे लागणार आहे. त्यामुळे प्राथमिक फेरीतील पहिल्या पाच लढतींत यश मिळवणारा संघ आरामात बाद फेरीत पोहचू शकतो असे सांगून मदनलाल म्हणाले, आपल्या संघाला सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांशी झुंजायचे आहे. त्यामुळे या लढती जिंकणे आपल्यासाठी लाभदायक ठरेल. पहिल्या चार लढतींत अपयश आल्यास मात्र आपली वाटचाल कठीण ठरेल.

गोलंदाजांच्या हाती यशाची चावी
यंदा विश्वचषकात आपल्या वेगवान गोलंदाजांच्या यशावर आपले यश अवलंबून असेल. त्यांना फिरकी गोलंदाजांचीही चांगली साथ लाभायला हवी, असे आग्रही मत मांडत मदनलाल म्हणाले, आपल्याकडे तीन स्टार वेगवान गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना यश लाभल्यास आपले काम अधिकच सोपे होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या