ऍड. शांताराम दातार


>>माधव डोळे<<

मराठी भाषा व संस्कृतीवर आक्रमण होत असतानाच आयुष्यभर मराठी हाच श्वास आणि ध्यास हा मूलमंत्र जपणारे ऍड. शांताराम दातार हे सर्वांनाच परिचित व्यक्तिमत्त्व. काटक शरीरयष्टी, मराठीचा जाज्वल्य अभिमान आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेले दातार हे मूळचे इंदोरचे. ९ जून १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लहान-मोठय़ा नोकऱया करून त्यांनी एलएलबीपर्यंत मजल मारली. प्रखर बुद्धिमत्ता व परिश्रम करण्याची तयारी असलेल्या दातार यांनी १९६८ मध्ये थेट कल्याण गाठले. बहीण इथे राहत असल्याने त्यांचा राहण्याचा प्रश्न मिटला. लहानपणापासूनच त्यांची विचारसरणी ही हिंदुत्वाची होती. दिवाणी न्यायालयात त्यांनी आपली वकिली सुरू केली. ५० हून अधिक वर्षे त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. एकीकडे वकिली करत असतानाच दुसरीकडे त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्तादेखील जागा होता. १९७२ पासून दातार यांनी जनसंघाचे काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. स्पष्टवक्तेपणा, साधी राहणी आणि गरीबांविषयी कळवळा या गुणांमुळे ते ठाणे जिह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. १९७४ मध्ये भारतीय जनसंघाच्या कल्याण शाखा उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. १९७५ मध्ये अचानकपणे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली आणि संपूर्ण देश हादरला. त्याचे पडसाद संवेदनशील मनाच्या दातार यांच्यावरही उमटले. वकिली व्यवसायावर आपली पत्नी, तीन लहान मुले अवलंबून असतानादेखील त्यांनी आणीबाणी विरोधातील लढय़ात भाग घेतला. एवढेच नव्हे तर आणीबाणीच्या विरुद्ध पत्रके वाटली, भाषणे केली. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तरीही ते आपल्या निष्ठsपासून ढळले नाहीत. कल्याणमधील अनेक बँकांचे वकील म्हणून काम पाहिले. जनता सहकारी बँकेचे ते संस्थापक सदस्य होते. वनवासी कल्याण आश्रमचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना दातार यांनी अनेक उपक्रम राबवले. ग्रामीण भागात पाणी मिळावे यासाठी त्यांनी आयोजित केलेली पाणी परिषद अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या या सर्व सामाजिक कार्याचा पाया हा अध्यात्मामध्ये होता. मात्र त्याचे त्यांनी स्तोम माजवले नाही. गीता अभ्यास मंडळ सुरू करून त्यांनी भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार केला. दातार यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे न्यायालयांचे कामकाज मराठीतून सुरू करणे हे होते. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर देशाच्या अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक भाषांमधून न्यायालयाचे कामकाज चालते. मग महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये मराठीतून कामकाज का होत नाही, या प्रश्नाने त्यांना अक्षरशः पछाडले. दुसरे कोणीतरी यावर आंदोलन करेल, आपण फक्त भाषणे ठोकू, असा विचार न करता दातार यांनी मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेची स्थापना केली आणि मग सुरू झाली ती रस्त्यावरील लढाई. न्यायालयांमध्ये दाद मागणाऱया पक्षकारांना निकालपत्र मराठी भाषेतूनच मिळावे यासाठी त्यांनी सर्व पातळय़ांवर लढा पुकारला. कल्याण तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. फक्त इंग्रजीतून कामकाज हे कसे बेकायदेशीर आहे हे त्यांनी सरकारला मुद्देसूदपणे पटवून दिले. त्यासाठी न्यायालयाचे दरवाजेदेखील ठोठावले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये फिरून त्यांनी मराठी वकिलांचे संघटन केले. राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीवरदेखील ते होते. मात्र या समितीच्या बैठकाच नियमितपणे होत नसल्याबाबत त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. मोर्चे, निवेदने, परिषदा यांद्वारे त्यांनी मराठीचा आग्रह धरला. एवढेच नव्हे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवरूनदेखील आपली सडेतोड भूमिका मांडून सरकारचे लक्ष वेधले. अखेर मराठीतून न्यायालयाचे कामकाज करण्याबाबतची अधिसूचना सरकारला काढावी लागली. तालुका व जिल्हास्तरावरील न्यायालयांमध्ये सध्या ५० टक्के कामकाज मराठीतून होते याचे श्रेय ऍड. शांताराम दातार यांच्याकडेच जाते. उच्च न्यायालयाचे कामकाजदेखील मराठीतूनच व्हायला पाहिजे असा आग्रह ते धरायचे.  केवळ न्यायालयाचे कामकाज मराठीतून व्हावे एवढय़ापुरतेच त्यांचे कार्य सीमित नव्हते तर मराठी भाषा ही जास्तीत जास्त विकसित व्हावी तसेच तरुण पिढीच्या रक्तात ही भिनावी यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने मराठीसाठी लढणारा एक योद्धा हरपला आहे.