मधु मंगेश कर्णिक

>> प्रशांत गौतम

प्रख्यात मराठी साहित्यिक तथा राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ फेब्रुवारी म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या औचित्याने मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात साजरा केला जातो. या जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मुंबईत २७ रोजी होत असलेल्या समारंभात केले जाणार आहे. कोकणातील वरुळ या खेडेगावात जन्मलेल्या मधुभाईंनी आपल्या अनेकविध साहित्यातून कोकणचे विलोभनीय दर्शन घडविले. सुरुवातीपासूनच लेखक आणि कार्यकर्ता हा प्रवास सोबतच होत गेला. कर्णिक यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर वेगळी लोकप्रियता प्राप्त केली. मराठी साहित्यात मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्तिचित्रण, संग्रह, ललित लेख, कथासंग्रह, बालसाहित्य, पर्यटन, नाटक, कादंबरी, कविता लेखन असे वैविध्यपूर्ण साहित्य प्रकार ताकदीने आणि विलक्षण अनुभुतीने हाताळले. त्यांच्या अभिजात साहित्यावर आधारित जुईली, भाकरी आणि फूल, रान माणूस, सांगाती या मालिका आल्या. आणि मधुभाईंच्या साहित्याने दूरदर्शनचा छोटा पडदाही व्यापून टाकला.

साहित्यरसिकांनी त्यांची ही सर्व साहित्यसंपदा ग्रंथाच्या माध्यमातून वाचलेलीच होती. दूरदर्शनसारख्या घराघरात पोहचलेल्या या सर्वदूर गेलेल्या माध्यमातून कोकणची माणसे, तेथील समाजजीवन याचाही परिचय झाला. मधु मंगेश यांच्या समग्र वाटचालीवर प्रकाश टाकणारे ‘वरुळचा मुलगा’ या शीर्षकाचे आत्मकथन मौज प्रकाशनाने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले. मराठी कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक अशी ओळख असणाऱ्या कर्णिक यांचा पहिला कथासंग्रह ‘कोकणची गं वस्ती!’ पहिल्या कथासंग्रहातून लेखकाच्या पाउैलखुणा पुढील काळात स्पष्ट होत गेल्या. कर्णिक यांचे मूळ घराणे तसे कोकणातील ओरस गावाचे. त्यांच्या पूर्वजांनी स्वकर्तृत्वावर, पेशव्यांकडून सनद मिळवली. अडीचशे वर्षांपूर्वी ‘वरुळ’ हे गाव वसवले. इंग्रज सरकारने कर्णिक घराण्यास खोलीही दिली. अशा या कर्तबगार घराण्यात मधुभाई लहानाचे मोठे झाले. लहानपणीच आई-वडिलांच्या मायेचे कृपाछत्र हरपले. कणकवलीत मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ एस.टी. खात्यात नोकरी स्वीकारली.

गोवा सरकारच्या प्रसिद्धी खात्यातही त्यांनी काम केले. मुंबई जनसंपर्क अधिकारी म्हणून सेवाकाळ बजावला. साहित्य क्षेत्रात लेखनकर्तृत्वाच्या बळावर त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. वयाची पन्नाशी गाठली असताना नोकरी सोडून साहित्य क्षेत्राला पूर्णवेळ समर्पित करण्याचा निर्णय घेतला. सत्यकथा, मौजमधून मधु मंगेश यांची कसदार साहित्याचे लेखक अशी ओळख तर महाराष्ट्रातील जाणकार साहित्यरसिकांना झालेलीच होती. विविध साप्ताहिक, वाङ्मयीन मासिके यात सातत्याने लेखन, स्तंभलेखन, चित्रपटांसाठी गीत लेखन, आकाशवाणीसाठी नभोनाटय़, श्रुतिका लेखन अशा कितीतरी प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. मधु मंगेश कर्णिक यांचा मूळ पिंड लेखकाचा, पण साहित्य समाज, संस्कृती चळवळीतील कार्यकर्ता ही त्यांची वेगळी ओळख सांगितली पाहिजे. कोकण साहित्य परिषदेच्या निर्मितीत त्यांचे मौलिक योगदान ठरले. गणपतीपुळे परिसरात मालगुंड येथे कविवर्य केशवसुत स्मारक मधु मंगेश यांच्या सक्रिय पुढाकारामुळे उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, राज्य मराठी विकास संस्था, अतिरिक्त संचालक अशी त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली. ग्रंथ लेखन, ग्रंथप्रसारासाठी मधु मंगेश कर्णिक यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी मॅजेस्टिक प्रकाशनाच्या केशवराव कोठावळे यांनी महाराष्ट्रात एखादे दर्जेदार वाङ्मय नियतकालिक असावे, प्रकाशनाचे मुखपत्र असावे आणि ग्रंथप्रसारासाठीही त्याचा उपयोग व्हावा, यासाठी ललित मासिकाची निर्मिती केली. केशवरावांसोबत जयवंत दळवी, वसंत सरवटे, रमेश मंत्री आणि मधु मंगेश कर्णिक हे संस्थापक होते. मधु मंगेश यांचा ललित आणि मॅजेस्टिक परिवाराचा स्नेह हा जवळपास अर्ध शतक एवढा प्रदीर्घ कालखंडाचा राहिला. रत्नागिरी येथे भरलेल्या ६४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या कर्णिक यांचा गदिमा, दमाणी, लाभसेटवार, पद्मश्री विखे अशा विविध पुरस्कारांनी गौरव झाला. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ज्या नामवंतांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यात मधु मंगेश यांचाही समावेश होता. या सर्व वाटचालींचा सन्मान आता राज्य शासनाच्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने झाला आहे.