असेही वेडे चाळे

अमित घोडेकर,[email protected]

किकी चॅलेंज… चालत्या गाडीतून उतरायचे… नाचायचे… आणि नाचत नाचत चालती गाडी पकडायची…

आजच्या सोशल नेटवार्ंकगच्या जमान्यात कधी काय घडेल याचा पत्ताच लागत नाही. काही गोष्टी क्षणात सर्वदूर पसरतात आणि काही वेळातच लोक त्याचे अनुकरण करू लागतात. त्याला म्हणे व्हायरल झालाय असा खास शब्द देखील दिला जातोय. हे व्हायरल होणे आपल्या शरीराला होणाऱया सर्दी-तापाच्या व्हायरल तापासारखेच आहे. फक्त इथे शरीराला नाही तर मनाला ताप येतो. जसे शरीराला ताप आल्यावर लोक काहीही बरळतात किंवा काही तरी चित्रविचित्र गोष्टी करतात तसेच आजच्या इंटरनेटच्या जगात देखील इंटरनेटवरून एखादी गोष्ट व्हायरल झाली की लोक काहीही करतात. मग ते शरीराचे चित्रविचित्र चाळे असोत की आणखी काही. आणखी एक गोष्ट म्हणजे शरीराला झालेला व्हायरल जसा मुदतीचा ताप असतो अगदी तसेच हे इंटरनेटचे व्हायरल होणे देखील हा पण एक मुदतीचा ताप असतो. एकदा गेला की परत कोणालाही आठवत देखील नाही. सध्या अशाच एका मुदतीच्या तापाने, अर्थात व्हायरलने सगळ्यांना गाठले आहे ते म्हणजे किकी चॅलेंज! आणि हा मुदतीचा व्हायरल ताप सध्या अनेक लोकांना मनस्ताप देखील देत आहे.

‘किकी चॅलेंज’ हे सध्या जगात सगळीकडेच व्हायरल झाले आहे. किकी चॅलेंजच्या पैजेत सर्वसामान्य लोक तर सापडलेच आहेत पण अनेक सेलिब्रिटी देखील हे किकी चॅलेंजच्या फंदात पडले आहेत. कॅनडाच्या हिपस्टार ड्रेकच्या स्कोर्पियन नावाच्या अल्बममधील ‘माय फिलिंग्स’ नावाच्या एका सुपरहिट गाण्यात गायक आणि त्याच्या सोबत नृत्य करणारे चालत्या कारमधून उडी टाकतात आणि गाडी चालत असतानाच नृत्य करत करत परत ती चालू गाडी पकडतात आणि गाण्याचे पुढचे कडवे ‘किकी डू यू लव्ह मी’ आणि ‘युसे नेव्हर एव्हर लिव बिसायीड मी’ असे म्हणत हे गाणे पूर्ण करतात. म्हणजे गाडी कितीही वेगात असली तरी चालेल पण ती परत पकडायची आणि नंतर किकीला सांगायचे की बाबा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला परत सोडून जाऊ नकोस!’

हे गाणे दाखल झाल्यावर लोकांनी किकीचे हे आव्हान स्वीकारले आणि त्याच्यासारखेच कोणी कार तर कोणी मोटारसायकल, कोणी बस आणि अनेक लोकांनी चक्क लोकल ट्रेन आणि ट्रेनमध्ये असा चालू गाडीत चढायचा आणि उतरायचा प्रताप केला आणि त्याचे चित्रीकरण करून सोशल नेटवर्क देखील टाकायला सुरुवात केली. त्यामुळे काही दिवसांतच किकी चॅलेंज खूप मोठय़ा प्रमाणात व्हायरल देखील झाले आणि व्हायरल होत असताना अनेक लोकांना अपघात देखील झाले. हे अपघात रस्त्यावर आणि रेल्वेत देखील झाले पण तरी देखील किकी चॅलेंज कमी व्हायचे नावच घेत नाहीये आणि अजून देखील लोक किकी चॅलेंजच्या नावाखाली अनेक वेडेवाकडे चाळे करतच आहेत.

किकी चॅलेंजचा हा ताप थेट पोलिसांपर्यंत येऊन पोहचला. एव्हाना आपला चांगला माहितीपूर्ण संदेश पोहचवण्यात अग्रभागी असलेल्या मुंबई पोलिसांनी किकी चॅलेंजवर कोटी करणारे अनेक संदेश समाजमाध्यमावर टाकले. उदा. किकीला आता स्वतःच्या चॅलेंजचा कंटाळा आहे. तुम्ही कशाला तुमचा जीव धोक्यात घालता? जर तुम्ही किकी चॅलेंज स्वीकारून रस्त्यावर नृत्य केले तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये नृत्य करायला शिकवू असे एक ना अनेक संदेश बंगलोर पोलिसांनी जनजागृतीसाठी टाकले. पण खरी मजा गेल्या आठवडय़ात आली. मुंबईतील एका त्रिकुटाने चक्क चालू लोकलमध्ये किकी चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला आणि तो युटय़ूबवर टाकला. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाल्यावर रेल्वे पोलिसांनी या त्रिकुटाला पकडून न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायमूर्तींनी या तिघांना तीन दिवस रेल्वे स्थानक स्वच्छ करण्याची आणि किकी चॅलेंज कसे धोकादायक आहे याची जनजागृती करण्याची अनोखी शिक्षा फर्मावली.