अभिनेता कमल हासन यांना अटकपूर्व जामीन

11

सामना ऑनलाईन। मदुराई

मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता व मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांना नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता या वादग्रस्त वक्तव्याच्या खटल्यात अटकपूर्व जामीन सोमवारी मंजूर केला.

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. पुगलेंधी यांनी मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांना अरावाकुरिची येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दहा हजार रुपयांचा बॉण्ड आणि तितक्याच रकमेचे दोन हमीदार कमल हसन यांना अटकपूर्व जामिनासाठी द्यावयाचे आहेत.

काय आहे प्रकरण

गेल्या आठवडय़ात अरावाकुरिची येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना कमल हसन यांनी स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला दहशतवादी हिंदू असल्याचे म्हटले होते. त्याचे नाव नथुराम गोडसे असून तेथून दहशतवाद सुरू झाला. नथुराम गोडसे याने महात्मा गांधींची हत्या केली असे हसन यांनी विधान केले होते.

हसन हे नोंदणी झालेल्या पक्षाचे नेते असून अद्यापि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करीत आहोत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कमल हसन यांच्यावर 14 मे रोजी एफआयआर दाखल झाला होता. त्यानंतर हसन यांनी अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. आपले वक्तव्य केवळ गोडसेबद्दल होते, संपूर्ण हिंदूंसाठी नाही असा दावा हसन यांनी केला होता.

भाजप, तामीळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक आणि हिंदू संघटनांनी कमल हसन यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या