महाडमध्ये टेम्पोची बसला धडक; ३५ प्रवासी जखमी व चालक ठार

सामना प्रतिनिधी । महाड

जुन्या सावित्री पुलावर आज पहाटे भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात टेम्पोचालकासह बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले. पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे साखरझोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. जिवाच्या आकांताने प्रवासी ओरडू लागले. या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसचा चालक व वाहकही जखमी झाला आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

पोलादपूरहून महाडच्या दिशेने जाणारा टेम्पो जुन्या सावित्री पुलावर येताच चालकाने मुंबईहून गुहागरकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की टेम्पोच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात टेम्पोचा चालक नावीद अब्बास वास्ता (४१) हा जागीच ठार झाला असून तो श्रीवर्धन तालुक्यातील मेटकरणी येथे राहणारा आहे.

टेम्पोचालक सावित्री नदीच्या नवीन पुलावरून न जाता जुन्या पुलावरून गेल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. एसटी बसमधील प्रवाशांना क्षणभर काय झाले हे समजेना. जोरदार आवाज येताच झोपेतील प्रवासी खडबडून जागे झाले. काहींच्या पायाला, हाताला व डोक्यालाही मार बसला. जखमी प्रवाशांना तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना घरी पाठविण्यात आले. या अपघातप्रकरणी महाडच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक मधाळे हे अधिक तपास करीत आहेत.

जखमींची नावे
एसटीचालक मुक्तार सय्यद (३३), काहक राजेश कसाके (४१), सुशांत आंब्रे (२७), रेखा चाळके (२७), कस्तुरी अजकळकर (४५), प्राची जाधक (२७), प्रशांत जाधक (३१), संदीप जाधक (४५), मुफिजा केळकर (२७), दीपक उतेकर (६१), अंजना उतेकर (८०), सीताराम धनाकडे (५७), साकित्री काताळकर (६६), ज्ञानेश्कर सोनकर (२०), सुनीता घडकले (६५), सुनीता दहिकलकर (६८), चंद्रभागा सैतकडेकर (५८), एकनाथ सैतकडेकर (६१), सुषमा सैतकडेकर (५०), सुप्रिया सुर्के (४०), अश्किनी सातके (४०), दत्ताराम सोलकर (६५), सुनीता शिर्के (७०), शरद शिर्के (४२), दीपाली कदम (१७), भाऊ कदम (२५), सुरेश माळी (६०), संदेश माळी (३२), संतोष कदम (४५), नुरमोहम्मद लालू (७०), खातुल लालू (६५), दिलीप मनकल (४४), दर्शना मनकल (३९), सुधाकर जंगम (७८), त्रिकेणी पारधी (३).

२ ऑगस्ट २०१६ च्या भयंकर आठवणी
सावित्री पुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दोन एसटी बसेस २ ऑगस्ट २०१६ रोजी रात्रीच्या अंधारात थेट नदीत पडल्या आणि एकच हाहाकार उडाला होता. अंगावर थरकाप उडणाऱया या महाभीषण घटनेत ३० जणांचा बळी गेला. आज पहाटे जुन्या सावित्री पुलावर झालेल्या अपघातामुळे या काळ्याकुट्ट घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. सुदैवाने मोठी प्राणहानी झाली नाही.