साखर झोपेतील ३७ जणांचे प्राण घेणाऱ्या ड्रायव्हरला १० वर्षांची शिक्षा

सामना प्रतिनिधी । खेड

जगबुडी पुलावर २०१३मध्ये झालेल्या महाकाली ट्रॅव्हल्सच्या अपघाताप्रकरणी न्यायालयाने चालकाला दोषी ठरवले आहे. चालक संताजी किरदत्त याने दारू पिऊन बस चालवल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला १० वर्षांची सत्कमजूरीची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठावला आहे. या भीषण अपघातामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला होता, तर १४ जखमी झाले होते.

महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस १८ मार्च २०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता गोवा येथून ३५ प्रवाशी घेऊन मुंबईकडे निघाली होती. चालक संताजी कैलास किरदत्त हा प्रत्येक थांब्यावर प्रवाशी घेतच होता. त्यामुळे बसमधील प्रवाशांची संख्या ५५ झाली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील ही बस महामार्गावरील जगबुडी पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे तोडून थेट साठ फुट कोरड्या नदीपात्रात कोसळली.

या अपघातानंतर खेड पोलिसांनी चालक किरदत्त याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. वैद्यकिय तपासणी दरम्यान किरदत्त यांने दारू पिल्याचे स्पष्ट झाले होते. गेली अनेक वर्षे न्यायप्रविष्ठ असलेला हा खटला आज खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर सुनावणीस आला असता सरकारी वकील मेघना नलावडे यांनी तपासलेले दहा साक्षीदार आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खेड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश जे.पी. झपाटे यांनी मद्यधुंद अवस्थेत बस चालवून ३७ प्रवाशांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या किरदत्त यास दहा वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावली.