सरकारने वाढवलेला दुधाचा खरेदी दर परवडेना

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्य सरकारने दुधाच्या खरेदी दरात तीन रुपयांची वाढ करून २७ रुपये केला, पण हाच वाढीव दर महानंद डेअरीला पचनी पडलेला नाही. दुधाच्या दरात वाढ झाल्यापासून डेअरीला प्रतिलिटरमागे दोन रुपयांहून अधिक तोटा होत आहे. महानंद दररोज अडीच लाख लिटर दूधपुरवठा होत असल्याने घाट्याचा आकडा दिवसाला पाच लाखांवर गेला आहे, तर गेल्या दोन महिन्यांत तब्बल तीन कोटी रुपये एवढा मोठा तोटा झाला आहे. यावर संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली.

शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर देण्यासाठी सरकारने २७ रुपये खरेदी दर २० जून रोजी जाहीर करतानाच विक्री दर वाढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे दूध संघांची आर्थिक कोंडी झाली. दरम्यान खासगी दूध संघ सरकारचे आदेश धाब्यावर बसवून २४-२५रु. प्रतिलिटर दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत आहे. महानंद डेअरी सहकारी तत्त्वावर चालत असल्याने सरकारच्या आदेशाचे पालन करत असून २७ रु. दराने दूध खरेदी करत आहे, तर जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रतिलिटरमागे संकलनासाठी प्रतिलिटरला अडीच रुपये द्यावे लागत आहेत. तसेच वाहतूक कर्मचारी आणि वितरण व्यवस्थेबरोबरच इतर खर्च साडेचौदा रुपये होत आहे. त्यामुळे प्रतिलिटर दुधामागे ४४ रुपये ५० पैसे एवढा खर्च होत आहे, तर प्रतिलिटरचा विक्री दर ४२ रुपये आहे. त्यामुळे डेअरीला लिटरमागे दोन रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारकडे अनुदानाची मागणी
दुधाचा खरेदी दर वाढलेला असताना सरकारने विक्रीदर स्थिर ठेवला आहे, त्यामुळे महानंदला तोटा सहन करावा लागत आहे तर खासगी संघ की दराने दूध खरेदी करत असल्याने त्यांना परवडत आहे. त्याचबरोबर कर्नाटकसह इतर राज्यांतून मुंबईत येणाऱया दुधाला संबंधित सरकार अनुदान देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानंदलाही राज्य सरकारने प्रतिलिटरमागे 4 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. सरकारने दुधाचा विक्रीदर स्थिर ठेवून खरेदी दरात तीन रुपयांची वाढ केल्याने महानंदला दोन महिन्यांत तीन कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे सरकारने डेअरीला अनुदान द्यावे.
-डी. के. पवार, उपाध्यक्ष, महानंद