कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ महारांगोळी

सामना प्रतिनिधी, नाशिक

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ नववर्ष स्वागत यात्रा समितीने नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस महारांगोळी रेखाटनाचा उपक्रम हाती घेतला आहे. आज सहाव्या माळेला त्यांनी पोलीस आयुक्तालयात महारांगोळी साकारून महिला अधिकाऱयांच्या कार्याचे कौतुक केले.

आदिशक्तीचे पूजन करण्यासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नवदुर्गांना रांगोळी कलेच्या माध्यमातून मानाचा मुजरा केला जात आहे. हे या उपक्रमाचे पहिले वर्ष आहे. संकल्पना रांगोळीकार नीलेश देशपांडे यांची असून, नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या महारांगोळी विभागातील अॅमी छेडा, आसावरी धर्माधिकारी, प्राची परदेशी, शुभांगी पुणेकर, पुनम घायतड आदींसह पंधरा जणी या रांगोळ्या काढण्यासाठी मेहनत घेत आहेत.

पहिल्या माळेला कला क्षेत्र, दुसऱया दिवशी पत्रकारिता, त्यानंतर समाजसेवा, उद्योग, योग-अध्यात्म या क्षेत्रातील नऊ महिलांच्या घरासमोर त्यांनी रांगोळी काढल्या. आयुक्तालयात आज त्यांनी पोलीस दलातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी महारांगोळी रेखाटली. त्यांचे आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी कौतुक केले. यावेळी उपायुक्त माधुरी कांगणे यांसह निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचारी उपस्थित होत्या.