क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद!

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । लातूर

मराठा आंदोलनाचा परीघ केवळ पंढरपूर आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाच्या पूजेपुरता सीमित नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असून येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी या प्रश्नी महाराष्ट्र बंद करण्याचे ठरले आहे. तथापि, राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधूनच यावर शिक्कमोर्तब करण्याचा निर्णय लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने रविवारी घेतलेल्या बैठकीत झाला.

मराठा क्रांती भवनात ही बैठक झाली. शिवनीती (गनिमी कावा) तंत्राने व जाहीरपणे आंदोलने करण्यात येणार असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व गावागावांतील लोकांना याबाबत कल्पना देऊन हे आंदोलन ऐतिहासिक करण्याचे बैठकीत ठरले.

दिशाभूल करा आणि वेळ मारून न्या हा कावा सरकारने मराठा समाजाशी अवलंबला असून आता मूक न राहता ठोकपणेच यास उत्तर देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

मराठा लोकप्रतिनिधींप्रती संताप

मराठा लोकप्रतिनिधींनी समाजाच्या प्रश्नांप्रती बाळगलेल्या मौनाबाबत तरुणांनी प्रचंड संताप व्यक्त केला. स्वार्थासाठी सोयीपुरता वापर करणाऱ्या या स्वकियांनीच समाजाचे वाटोळे केले, असा आरोप करत त्यांना त्यांची जागा दाखवा असेही आवाहन या बैठकीतून करण्यात आले.