थकबाकी कशी भरायची हा शेतकऱ्यांचा प्रश्न! रावसाहेब दानवे यांचे संतापजनक विधान

raosaheb-danve

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

ज्या शेतकऱ्यांवर सहा लाख रुपये कर्जाची थकबाकी आहे त्यांना दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असल्यास उर्वरित साडेचार लाखांची थकबाकी आधी बँकेत भरावी लागेल. ही थकबाकीची रक्कम त्याने कुठून आणायची आणि कशी भरायची हा त्याचा प्रश्न आहे असे संतापजनक विधान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

महापौर बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर ते बोलत होते. दानवे यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात कर्जमाफीच्या मुद्द्यावरच केली.

पत्रकारांनी त्यांना विचारले की, ज्या शेतकऱ्यांची सहा लाखांची कर्जाची थकबाकी असेल त्याला दीड लाख रुपये कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर त्याला साडेचार लाख रुपये आधी भरावे लागतील. हे पैसे भरण्यासाठी शेतकऱ्याकडे असते तर तो थकबाकीदार राहिलाच नसता. तेव्हा दीड लाखाचा लाभ घेण्यासाठी अशा शेतकऱ्याने साडेचार लाख आणायचे कुठून, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता दानवे म्हणाले ‘हा त्यांचा प्रश्न आहे!’

यानंतरही पत्रकारांनी त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली असता दानवे यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर न देता केवळ टोलवाटोलवी केल़ी शिवसेनेसंबंधी विचारलेल्या प्रश्नावरही दानवे यांनी मौनच बाळगल़े