14 जूनला मंत्रिमंडळ विस्तार,2 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री पदांचा समावेश

28

सामना ऑनलाईन, मुंबई

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा राज्यापासून दिल्लीपर्यंत रंगल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितल्यानंतर आज मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठकांमागून बैठका पार पडल्या.  विरोधी पक्षनेते पद सोडून भाजपच्या मार्गावर असलेल्या राधाकृष्ण विखे–पाटलांपासून काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज चर्चा केली. या बैठकांमध्ये संभाव्य मंत्रिमंडळातील चेहरे तसेच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही निश्चित झाली असून 14 जून रोजी शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेसचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी किरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर, विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मंत्रालयात चर्चा केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. या चर्चेनंतर संभाव्य विस्तारात कोणाकोणाची कर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. याच गदारोळात विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबाकडे राज्यपालपद जाते की मंत्रीपद येते यावरही चर्चा सुरू झाली आहे. 12 व 13 जून रोजी भाजपच्या कोअर कमिटीची पुन्हा एकदा दिल्लीत बैठक आहे. या बैठकीत नावे अंतिम झाल्यानंतर 14 जून रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

कोळंबकर, सत्तारांना सबुरीचा सल्ला

भाजपच्या उंबरठय़ावर असलेले काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर तसेच अब्दुल सत्तार यांच्यासोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आमचे भवितव्य काय, असा सवालही या आमदारांकडून करण्यात आला. एकीकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त सापडत नसताना
कालिदास कोळंबकर तसेच अब्दुल सत्तार यांना अधिवेशन पार पडेपर्यंत सबुरी राखण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.

विस्तार अधिवेशनापूर्वीच – सुधीर मुनगंटीवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मुहूर्त ठरला असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी सांगितले. मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनापूर्वीच होणार आणि कोणत्याही क्षणी सर्वांना गोड बातमी मिळणार असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी या विस्तारात सेना-भाजप आणि मित्रपक्षांना सगळे मनासारखे वाटप होईल, असेही सुतोवाच केले.

खातेवाटपाचा वाद नाही

खातेवाटपाचा वाद कुठेही नाही तसेच विधानसभा निवडणुकांसाठी जागांचे समसमान वाटप होईल यात काही शंका नाही. कारण युतीच्या संदर्भातील धोरण हे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवलेय. त्यात बदल होणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘अब की बार 220 के पार’ हा फॉर्म्युला ठरलाय. त्यानुसार काम होतेय. त्यामुळे कोणाचा मंत्री आणि कोणाचा मुख्यमंत्री हा वाद नाही. तसेच कोण काय होईल हे एकत्रित बसून ठरवू, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

यांच्या नावाची चर्चा

  • अतुल सावे
  • शिवाजीराव नाईक
  • संजय कुटे
  • आशीष शेलार
  • रणजितसिंह मोहिते

नवीन मंत्रिमंडळ विस्तारात दोन कॅबिनेट मंत्रीपदे तर पाच राज्यमंत्री पदे दिली जाणार आहेत. आरोग्य आणि कृषी विभागाचा कॅबिनेट मंत्रीपदांमध्ये समावेश आहे. पाच राज्यमंत्र्यांमध्ये मराठवाडय़ातील आमदार अतुल सावे, सांगलीचे शिवाजीराव नाईक, बुलढाण्याचे संजय कुटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या गिरीश बापट यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन तसेच संसदीय कार्यमंत्री ही खाती जयकुमार रावल तसेच विनोद तावडे यांच्याकडे तात्पुरती सोपविण्यात आली असली तरी राज्यमंत्र्यांकडे ही खाती सोपविली जाऊ शकतात.  भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नावाचीही चर्चा आहे. विजयसिंह मोहिते भाजपमध्ये आल्यास त्यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते किंवा त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होऊ शकेल, असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या