पूल दुर्घटनेमुळे ऑडिटवरच प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

cm-devendra-fadanvis-csmt

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई सीएसएमटी रेल्वेस्थानकाला जोडणारा पादचारी पूल कोसळणं ही अतिशय दुर्दैवी घटना असून स्ट्रक्चरल ऑडिटनंतर देखील अशी घटना घडणे ही गंभीर आहे. संपूर्ण ऑडिट प्रक्रियेवरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याची चौकशी करून संध्याकाळपर्यंत प्राथमिक जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री सीएसएमटी स्थानकाला जोडणारा हिमालय पूलाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 6 जण ठार तर 31 जखमी झाले. यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जेजे रुग्णालयात जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून घटनेचे गांभिर्य लक्षातघेता आज संध्याकाळपर्यंत दुर्घटनेसाठी प्राथिमक जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश आयुक्तांना दिल्याचे सांगितले.

स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर देखील ही घटना घडते ही गंभीर बाब आहे. या पुलासंदर्भात केवळ डागडुजी करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ऑडिटच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. म्हणून मुंबईतील ज्या पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट झाले आहे त्याचे रि-ऑडिट (पुनर्परीक्षण) करण्याची गरज असून ते करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसचे या दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली असून 10 जण वॉर्डमध्ये आणि एक जण आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आयसीयूमधील व्यक्तीची प्रकृती ठीक असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेसाठी जे कोणी दोषी असतील त्यांची हयगय केली जाणार नाही. मी पोलिसांनी आदेश दिले आहेत की दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

जखमींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट दिली. संपूर्ण जागेची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या.