प्लॅस्टिकपासून इंधन, भरती-ओहोटीतून वीजनिर्मिती, विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारला ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’

1

सामना ऑनलाईन, मुंबई

विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आधुनिक महाराष्ट्र कसा साकारू शकतो याचे सादरीकरणच ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’तून करण्यात आले. प्लॅस्टिकपासून डिझेलसदृश इंधननिर्मिती, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, भरती-ओहोटीतून वीजनिर्मिती, आधुनिक शेतीच्या उपाययोजना याच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी आधुनिक महाराष्ट्रासाठीच्या उपाययोजनांचा पटच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला.

‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’च्या माध्यमातून सुमारे सहा लाख युवकांनी सहभाग नोंदविला, २३०० हून अधिक सादरीकरण प्राप्त झाले. त्यातील निवडक ११ सादरीकरण वरळी येथील एनएसएसीआयमध्ये आज करण्यात आले. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगपती रतन टाटा, अभिनेता अक्षयकुमार यांनी भेट दिली.

दुष्काळ आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या प्रकल्पाचे केले एसडीएसएस हे मॉडेल सादर करून जलसंधारणाचा पर्याय समोर ठेवला. व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी ऑनलाइन सेवांच्या वापराचे सादरीकरण केले तर गावदेवी येथील शारदा मंदिर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती साकारताना चुंबकीय शक्तीचा वापर करून बियाण्यांची प्रथिनक्षमता कशी वाढवता येते याचे सादरीकरण केले.

भाईंदर येथील प्रवीण पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समुद्राला येणाऱ्या भरती-आहोटीतून वीजनिर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सादर केला. खारघरच्या भारती विद्यापीठाने एक उपकरण बनविले असून या उपकरणात प्लॅस्टिकचे विघटन करून त्यापासून डिझेलसारखे इंधन बनविणे शक्य असल्याचे प्रयोगातून दाखविले.

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टीम
‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या अंमलबजाकणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार असून यात मंत्रीगटातील एक, मुख्यमंत्री सचिवालयातील संबंधित अधिकारी आदींचा समावेश असेल. येत्या ६ महिन्यांत आज निवडण्यात आलेल्या ११ सादरीकरणांचा अभ्यास करून या संकल्पनांचा अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज दिली.

कॅप्टन यादवांच्या विमाननिर्मितीला मिळणार पंतप्रधानांचे बळ
कॅप्टन अमोल यादव यांनी साकारलेले पहिले भारतीय बनावटीचे सहा आसनी विमानही एनएससीआय येथील एक्झिबिशनमध्ये ठेवण्यात आले होते. कॅप्टन अमोल यादव यांच्या विमाननिर्मितीला व्यावसायिक परवानगी मिळावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. ही परवानगी लवकरच मिळणार असून हिंदुस्थानी बनावटीचे विमान अवकाशात झेपावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.