मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

सामना प्रतिनिधी, नाशिक

मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच हेलिकॉप्टर लँडिंग करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगरातील नियोजित कार्यक्रमाकरीता जायला निघाले असतांना हा प्रकार घडला. नाशिकच्या पोलीस परेड मैदानावरून हेलिकॉप्टरने टेक ऑफ करताच हेलिकॉप्टर वरच्यावर घिरट्या घेऊ लागल्याने त्यात मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे खास खानसामे सतीश यांना हेलिकॉप्टरमधून उतरविल्यानंतर या हेलिकॉप्टरने संभाजीनगरच्या दिशेने उड्डाण घेतले. या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव प्रवास करत होते.