महाराष्ट्राच्या मुलींचा तिसरा क्रमांक

सामना ऑनलाईन । मुंबई

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियन खांडवा (मध्य प्रदेश) येथे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने आंध्र प्रदेश संघावर १० विकेट व २ षटके राखून शानदार विजय मिळवला आणि १७ वर्षांखालील गटात तिसऱ्या क्रमांकासह कास्य पदक पटकावण्याचा पराक्रम केला. महाराष्ट्राची कर्णधार आचल वळंजू हिने स्पर्धेत २०७ धावांची नोंद करीत सर्वोत्तम फलंदाज हा बहुमान पटकावला. आचल ही दादरच्या शारदाश्रम इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे.

राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने आंध्र प्रदेशला १५ षटकांत ६९ धावांवरच रोखले. त्यानंतर कर्णधार आचल वळंजूच्या धडकेबाज ५० धावांच्या खेळीमुळे महाराष्ट्र शालेय संघाने आंध्र प्रदेशवर १० विकेट राखून विजय मिळवत कास्य पदक पटकावले. महाराष्ट्र संघात उपकर्णधार युगंधरा सप्रे, अक्षी गुरव, वैभवी राजा, सोनल बोहाडे, संचिता आमूनडकर, भावना काळे, श्रावणी देसाई, अनिझा शेख, रसिका शिंदे, अंजली चिट्टे, साक्षी मिरगणे, भक्ती मिरजकर, कविता कुवर, सपना देशमुख व शरयू चौधरी यांचाही समावेश होता. संघाला वैशाली शिंदे यांनी प्रशिक्षण दिले तर संघ व्यवस्थापक म्हणून सुनील दादळे यांनी जबाबदारी पार पाडली.