जीवघेण्या किटकनाशक प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

सामना ऑनलाईन । मुंबई

जीवघेण्या किटकनाशकांच्या फवारणीमुळे २० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून ६०० पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत महाराष्ट्र सरकारने दिले आहेत.

चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील सरकारने समिती नेमली आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांपासून किटकनाशक फवारणीमुळे मृत्यू होत असताना याची माहिती स्थानिक प्रशासनाने मंत्रालयात कळवलीच नव्हती, असे आता उघड झाले आहे. प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्यानंतर स्थानिक सरकारी यंत्रणा जागी झाली आणि माहिती मंत्रालयाला देण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

ज्यांनी पुरेशी तपासणी न करता अथवा आलेल्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष करुन जीवघेण्या किटकनाशकांच्या वापराची परवानगी दिली तसेच ज्यांनी सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले त्यांची चौकशी होऊन ते दोषी आढळल्यास कारवाई होणार आहे.