अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांकडे १० लाखांचा धनादेश सुपूर्द

सामना प्रतिनिधी । सांगली

पोलिसी अत्याचारात बळी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दहा लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आज जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख आणि राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अनिकेतची आई व पत्नीकडे सुपूर्द केला. दरम्यान, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षिका डॉ. दीपाली काळे यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले, तर मंत्र्यांच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिल्यानंतर कोथळेंच्या घरानजीक तृप्ती देसाईंसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी अमानुष मारहाण करून अनिकेत कोथळेचा बळी घेतला. गेले आठवडाभर या प्रकरणाने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी विविध संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या प्रकरणाची राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने कोथळे कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदतीची घोषणा केली आणि आज प्रत्यक्षात दहा लाख रुपयांचा धनादेश घेऊन पुन्हा सांगलीत आले. आज त्यांच्यासमवेत जिह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख होते. कोथळेंच्या थेट घरी जाऊन या दोन मंत्र्यांनी त्यांना दहा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, शहरप्रमुख मयूर घोडके, नगरसेवक शेखर माने, अमोल पाटील, अजिंक्य पाटील, भाजपच्या नीता केळकर, जिल्हाधिकारी विजय काळम, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

निःपक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास गतीने करून गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री देशमुख व गृहराज्यमंत्री केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोथळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या मागण्यांपैकी बहुतांशी मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. जागा रिक्त होताच अनिकेतच्या पत्नीला शासकीय सेवेत नियमानुसार घेण्याबाबत जिल्हाधिकाऱयांना सांगण्यात आले आहे. असे सांगून गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले, या सर्व प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहेत. या अनुषंगाने जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सांगलीकर जनतेने खूप चांगली शांतता पाळून गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य दिले.

मी बाहेर दौऱयावर असल्याने सांगलीत तातडीने आलो नाही. मात्र, या घटनेची सर्व माहिती मी घेतली आहे. यातील दोषी पोलीस अधिकाऱयांवर कडक कारवाई होईल यादृष्टीने सर्व यंत्रणेला आदेश दिले आहेत. कोथळे कुटुंबीयांना न्याय देण्याचा सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोथळे हत्येप्रकरणी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपअधीक्षिका डॉ. दीपाली काळे यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. चंदन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री कोथळे कुटुंबाच्या घरी भेट देणार असल्याचे समजताच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोथळे कुटुंबीयांच्या दारात जाऊन मंत्र्यांच्या गाडय़ा अडविण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले.

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जनतेने आम्हाला न्याय मिळावा यासाठी चांगली भूमिका घेतली. परंतु, लोकांना त्रास होईल अशी प्रक्षोभक आंदोलने करू नयेत. जनतेने सामंजस्याने घ्यावे, असे आवाहन कोथळे कुटुंबीयांच्या वतीने पत्रकार बैठकीत करण्यात आले. सरकारने आम्हाला दिलेल्या आश्वासनापैकी काही आश्वासने पूर्ण झाली असली, तरी उर्वरित मागण्यांबाबत लेखी हमीपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या घटनेमागचे नेमके कारण पुढे आले नाही, ते यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी नगरसेवक शेखर माने, शिवसेनेचे सांगली शहरप्रमुख मयूर घोडके उपस्थित होते.