रक्तसंकलनात महाराष्ट्र आघाडीवर

रक्तदान म्हणजे जीवनदान. गेल्या काही वर्षांपासून राज्यात ‘महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने’ (एसबीटीसी)ने सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबवल्यामुळे रक्तदानाचे प्रमाण काढले आहे. सर्वाधिक रक्त जमा करण्यामध्ये देशात महाराष्ट्राने अव्वल क्रमांक कायम राखला असून शहरामध्ये मुंबई, पुणे आघाडीवर आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईत सर्वाधिक म्हणजे सुमारे ३ लाख ४ हजार युनिट रक्तसंकलन झाले आहे.

मुंबई अव्वल
एसबीटीसीने केलेली जनजागृती तसेच रक्तपेढय़ांसह राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांकडून राबवण्यात येणाऱ्यां शिबिरांमुळे रक्तदानाचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात विविध रक्तदान शिबिरांमधून सुमारे ३ लाख ४ हजार युनिट रक्तसंकलन झाले आहे. मुंबईखालोखाल पुणे दुसऱ्यां क्रमांकावर तर ठाणे तिसऱ्यां क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात पुण्यात २ लाख ५ हजार तर ठाण्यामध्ये १ लाख २५ हजार युनिट रक्तसंकलन झाले आहे.

ब्लड ऑन कॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद
रुग्णांच्या नातेवाईकांची ऐनवेळी होणारी धावपळ थांबवण्यासाठी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना जानेवारी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेनुसार गरजू रुग्णांचे नातेवाईक १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून रक्त मिळवू शकतात. या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

रक्तदान का करावे?
रक्ताची निर्मिती कोणत्याही कारखान्यात होत नसते. रक्तदानातूनच रक्ताची गरज पूर्ण होत असते. कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना पेशंटांना थॅलिसिमिया आजाराने ग्रस्त बालके आणि तीव्र अनिमिया असलेल्या पेशंटांना देखील रक्ताची नियमित आवश्यकता असते.रक्तदानामुळे एका गरजवंत पेशंटांचे प्राण वाचवता येतात.

रक्तदान कोण करू शकते
प्रत्येकातील केवळ ३५० मिलि रक्त एक ते तीन पेशंटांना जीवनदान देऊ शकतात.१८ ते ६० वर्षामधील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते.रक्तदान करणाया व्यक्तीचे वजन हे ४५ किलो पेक्षा जास्त असावे.हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १२.५ ग्राम टक्केपेक्षा जास्त असावे. ब्लड प्रेशर लो किवा हाय असणा-यांनी रक्तदान करताना त्याची चाचणी करून पहावी.

उन्हाळ्यात रक्तदात्यांची शिबिरांकडे पाठ

मार्च ते जून या महिन्यात असलेली उन्हाळय़ाची सुट्टी, पर्यटन, शाळा-कॉलेजला सुट्टी यामुळे या काळात रक्तदान शिबिरांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे या काळात गरजू रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून अधिकाधिक रक्तदात्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने रेल्वे स्थानकांच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याता निर्णय घेतला असून त्यासाठी सर्व रक्तपेढय़ांना लेखी निर्देश दिले आहेत.

रक्तदान करण्यात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. २०१४ मध्ये सुमारे १५ लाख ६२ हजार युनिट रक्तसंकलन झाले. २०१५ मध्ये हा आकडा १५ लाख ६६ हजारांवर तर २०१६ मध्ये १६ लाख १७ हजारांवर पोहोचला आहे.

  •  रक्तपेढय़ांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य रक्त संक्रमण समिती पार पाडते. राज्यात रक्तदात्यांचे प्रमाण वाढावे याकरिता समितीतर्फे वर्षभर विविध शाळा-कॉलेजांमध्ये रक्तदान शिबीर भरवण्यात येते. याशिवाय निबंध स्पर्धा, जाहिराती, चर्चासत्र यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.
  • शासकीय रक्तपेढय़ांमध्ये रक्तपिशवीच्या प्रति युनिटचा दर ८५० रुपये आहे, तर खासगी रक्तपेढय़ांमध्ये प्रति युनिटचा दर १४५० रुपये आहे. हे दर शासनाने ठरवून दिले असून यापेक्षा अधिक दराने रक्तपिशवीची विक्री केल्यास त्या खासगी रक्तपेढीची मान्यता रद्द होऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार एकूण लोकसंख्येच्या १ टक्के रक्तसंकलन होणे आवश्यक आहे. मुंबईत हे प्रमाण १ टक्क्यांहून अधिक आहे. राज्यभरात ३२६ रक्तपेढय़ा असून त्यापैकी ५९ रक्तपेढय़ा मुंबईत आहेत. रक्तदात्यांचे आणि शिबीर आयोजकांचे आभार मानण्यासाठी तसेच नवीन रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी २००४ सालापासून दरवर्षी १४ जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो.

दिवसेंदिवस रक्ताची मागणी वाढत आहे. मुबलक रक्तसाठा रक्तपेढीत तेव्हाच उपलब्ध होऊ शकतो जेव्हा रक्तदाते स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घेतील. रस्ते अपघात, रक्ताचे विकार, प्रसूती, नैसर्गिक व मानवी आपत्ती अशा परिस्थितीत मोठय़ा प्रमाणात रक्ताची गरज असते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यायला हवा.
– डॉ. अरुण थोरात, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद