19 ते 23 दरम्यान रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा – अर्जुन खोतकर

सामना प्रतिनिधी । जालना

19 ते 23 डिसेंबर या कालावधीत जालना शहरात 62 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असल्याची माहिती राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, युवासेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यु खोतकर, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे दयानंद भक्त, पंचायत समिती सभापती पांडूरंग डोंगरे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, गणेश सुपारकर आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेच्या उद्घाटनास सिनेअभिनेते उपस्थित राहणार आहेत.

यावेळी माहिती देताना राज्यमंत्री तथा आयोजक अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील व महानगर पालिका क्षेत्रातील 45 संघासह 900 पहेलवान, 100 संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी (पंच), महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे 90 पदाधिकारी व प्रतिनिधी, 40 महाराष्ट्र तसेच हिंदुस्थानातील प्रसिध्द कुस्तीपटू, 2 हिंदुस्थानीय कुस्ती संघ निरीक्षक, 2 हिंदुस्थानी शैली कुस्ती संघ निरीक्षक, महाराष्ट्र ऑलम्पीक निरीक्षक असे एकुण 1 हजार 260 मल्ल व अधिकारी स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.

पुढे माहिती देतांना राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, या कुस्ती स्पर्धा 57 किलो., 61किलो., 65 किलो., 70 किलो., 74 किलो., 79 किलो., 86 किलो., 92 किलो., 97 किलो वजनी गट व महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो वजनी गट असणार आहेत. गादी गटामध्ये 10 व माती गटामध्ये 10 असे 20 खेळाडू प्रत्येक संघातून या स्पर्धेत आपल्या जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या मल्लास 2 लाख रोख व चांदीची गदा देण्यात येणार आहे. तसेच उपविजेता उप-महाराष्ट्र केसरी- मल्लास रोख 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येतात. यामध्ये वाढ करण्याचा विचार असल्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले. स्पर्धेसाठी शहरातील आझाद मैदानावर 2 मातीचे आखाडे तसेच 2 गादीचे आखाडे निर्माण करण्याचे कार्य जोमाने सुरु असून 50 हजार प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेसाठी गॅलरीची उभारणी सुरु आहे. स्पर्धेसाठी रुस्तमे हिंद दादु चौगुले (ध्यानचंद पुरस्कार प्राप्त), रुस्तुमे हिंद अमोल बुचडे, भारत केसरी गुलाम साबेर पहेलवान, ऑलम्पीयन मारोती आडकर, बंडा पाटील, ट्रीपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, विजय चौधरी, राष्ट्रकुल पदक विजेता राहुल आवारे, प्रसिध्द क्रिकेटपटु विजय झोल, महाराष्ट्र केसरी विष्णु जोशिलकर, सईद चाऊस, शिवाजी केकाण, चंद्रहार पाटील असे कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मल्ल या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, माजी वेंâद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समिती सचिव प्राचार्य डॉ. दयानंद भक्त, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशनलाल उस्ताद भगत, प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे, संजय खोतकर,युवा राज्य विस्तारक अभिमन्यु खोतकर, शिवसेना शहरप्रमुख प्रा. डॉ. आत्मानंद भक्त, लक्ष्मणराव सुपारकर, गोपाल काबलिये, पहेलवान. शिवा शेळके आदी परिश्रम घेत आहेत.