अॅडमिशनचे वाट्टोळे, सीबीएसई, आयसीएसईच्या छप्परफाड गुणांमुळे महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी मागेच

81

सामना ऑनलाईन । मुंबई

नवीन अभ्यासक्रम, बदललेला पेपरपॅटर्न तसेच भाषा विषयांची 20 गुणांची तोंडी परीक्षा नसल्याने दहावीच्या परीक्षेतील गुणांची खैरात यंदा बंद झाली आहे. त्यामुळे 13 वर्षांनंतर प्रथमच एसएससीचा निकाल तब्बल 12.21 टक्क्यांनी घसरला आहे. याचा परिणाम यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशावर होणार आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या निकालात विद्यार्थ्यांना ‘छप्परफाड’ गुण मिळाल्याने गुणवत्ता घसरलेले एसएससीचे विद्यार्थी मागे पडणार असून त्यांच्या अकरावी ऍडमिशनचे ‘वाट्टोळे’ होणार आहे.

राज्यातील एकूण 28 हजार 516 विद्यार्थ्यांना 90 व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यात मुंबई विभागातील केवळ 5 हजार 399 विद्यार्थीच आहेत. सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांचे हे प्रमाण पाहिल्यास सुमारे दहा हजारांवर विद्यार्थी हे 90 टक्क्यांच्या वर आहेत. त्यामुळे नामांकित कॉलेजमधील जागांवर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्याच विद्यार्थ्यांचे वर्चस्व असणार आहे. या बोर्डातील विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीमुळे नामांकित कॉलेजमधील पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफदेखील चढाच असणार आहे.

चुरस फक्त नामांकित कॉलेजमधील अनुदानित जागांसाठीच
मुंबईतील काही नामांकित कॉलेजमध्येच अकरावी प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळते. विद्यार्थ्यांचा अमुक एका कॉलेजमध्येच प्रवेश घेण्याकडे कल असतो, पण यंदाचा दहावीचा निकाल पाहता एकेका जागेसाठी मोठी चुरस होणार आहे. टॉप कॉलेजमध्ये सुमारे 700 जागा अनुदानित असतात. या जागांसाठी जाहीर होणारी कटऑफही 97 टक्क्यांवर क्लोज होते. यंदा मुंबई विभागात 35 नव्या कॉलेजना परवानगी मिळाली असून सुमारे साडेपाच हजार जागा वाढल्या आहेत, पण या जागांवर प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नसतात. या जागा स्वयंअर्थसहाय्यित असल्याने एकतर जादा फी भरावी लागते. त्यातच प्रवेशाच्या तोंडावर या जागांना परवानगी मिळत असल्याने विद्यार्थ्यांना या जागांविषयी फारशी माहिती नसते.

85 टक्क्यांपर्यंतचे फक्त 17 हजार 151 विद्यार्थीच
मुंबई विभागातील फक्त 17 हजार 151 विद्यार्थ्यांनाच 85 टक्क्यांपर्यंतचे गुण मिळाले आहेत. ही संख्या यंदाच्या वर्षी 16 हजार 050 ने कमी झाली आहे. गेल्या वर्षी तब्बल 33 हजार 201 विद्यार्थी 85 टक्क्यांच्या वर होते. यंदाच्या निकालाच गुणवत्ता घसरल्याने हजारो विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजचे दरवाजे बंद होणार आहेत.

20 विद्यार्थी, 1794 शाळांचा 100 टक्के निकाल
राज्यातील केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यात लातूर विभागातील 16, संभाजीनगर 3 तर अमरावतीतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. गेल्या वर्षी ही संख्या 103 होती, तर 100 टक्के निकाल लागलेल्या शाळादेखील कमी झाल्या आहेत. केवळ 1794 शाळांचाच 100 टक्के निकाल लागला आहे. गेल्या वर्षी या शाळा तब्बल 4.28 होत्या.

मुंबईतील 5399 विद्यार्थी 90 टक्क्यांवर
90 टक्क्यांवर असणाऱया राज्यातील एकूण 28 हजार 516 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचे 5,399 विद्यार्थी आहेत. पुणे विभागातील सर्वाधिक 5435 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर 4207, संभाजीनगर 3508, अमरावती 2725, लातूर 2591, नाशिक 2506, नागपूर 1385 आणि कोकण 760 विद्यार्थी आहेत.

राज्यात कोकण सलग आठव्यांदा अव्वल
दहावीच्या परीक्षेत कोकणने सलग आठव्यांदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकणाचा निकाल 88.38 टक्के लागला आहे. रत्नागिरी जिह्याचा निकाल 87 टक्के आणि ंिसधुदुर्गचा निकाल 91.24 टक्के लागला आहे. राज्यात कोकण अव्वल असला तरी विभागीय टक्केवारीमध्ये कोकणची आकडेवारी घसरली आहे. गेल्या 8 वर्षांत पहिल्यांदा कोकण विभागीय मंडळाचा निकाल 93 टक्क्यांहून कमी लागला आहे. यंदाचा नाकाल गतवर्षीपेक्षा 7 टक्क्यांनी घसरला आहे. रत्नागिरीतील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल येथे शिकणार्या विश्वजीत सामंत याने 99 टक्के गुण मिळवले आहेत. पटवर्धन हायस्कूलमधील संजूश्री गोरे हिने 98.40 टक्के तर लांजातल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या आशुतोष पिसेने 98.40 टक्के गुण मिळवले. फाटक हायस्कूल रत्नागिरीमधील मिहीर माईणकर याने 98 टक्के गुण मिळवले आहेत.

निकालाची वेबसाईट हँग
ऑनलाईन निकालासोबतच विविध सांख्यिकी माहिती पाहण्यासाठी अनेकजण www.medahedresuledt.niced.in ही वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न करीत होती. पण एक वाजल्यापासूनच ही वेबसाईट हँग होती. सुमारे चार ते पाच तास या वेबसाईटवर एरर असा मेसेजच दिसत होता.

1 लाख 36 हजार 979 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण
नृत्य- 1,757
गायन- 1,428
नाटय़- 149
फोकल- 4,875
वादन- 1130
स्पोर्टस्- 15,692
चित्रकला- 1,11,975
एनसीसी- 2
स्काऊट, गाईड- 34

2006 नंतर निकालात मोठी घसरण
2006 नंतर यंदा प्रथमच दहावीच्या निकालात मोठी घसरण पहायला मिळाली 2006 आणि 2007 मध्ये अनुक्रमे 72.72 आणि 78.67 टक्के निकाल लागला. या वर्षांतदेखील तोंडी परीक्षा नव्हत्या. 2008 सालापासून दहावीला तोंडी परीक्षा सुरू झाल्या आणि निकालात मोठी वाढ पहायला मिळाली.

2008 पासून असा निकाल वाढला.

2008 – 87.41
2009 – 84.21
2010 – 83.62
2011 – 76.06
2012 – 81.32
2013 – 83.48
2014 – 88.32
2015 – 91.46
2016 – 89.56
2017 – 88.74
2018 – 89.41
2019 – 77.10 (तोंडी परीक्षा बंद)

नाशिक विभागातील 68 हजार विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी
नाशिक विभागाचा निकाल 77.58 टक्के लागला असून तब्बल 68 हजार 11 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. विभागातून एकूण 1 लाख 54 हजार 193 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागात सर्वाधिक निकाल नाशिक जिह्याचा 78.86 टक्के आहे, त्यापाठोपाठ धुळे- 77.11, जळगाव- 76.92, नंदुरबार- 74.44 अशी टक्केवारी आहे. 37 हजार 629 विद्यार्थी 75 टक्क्याहून अधिक गुण मिळवित विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. विषयनिहाय निकालाची टक्केवारी बघितली असता सर्वाधिक 96.33 टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले आहेत. मागील पाच वर्षात नाशिकच्या निकालात 14.58 टकक्यांची घट पहायला मिळाली. सन 2015 मध्ये नाशिक विभागाचा निकाल 92.16 टक्के होता. सन 2016- 89.61, 2017- 87.76, 2018- 87.42 टक्के निकाल लागला. विभागातील 179 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

मुंबईतील शाखानिहाय उपलब्ध जागा
एकूण महाविद्यालये – 810
एकूण जागा- 2,31,181
कला – 22,238
वाणिज्य- 1,42,043
विज्ञान – 61,011
एससीव्हीसी – 3,881
अल्पसंख्याक, इनहाऊस,व्यवस्थापन कोटय़ाच्या जागा – 1,37,814

गुणांची सूज कमी झाली
2007 च्या परीक्षेत तोंडी परीक्षा नव्हत्या. त्यावेळी निकाल 78 टक्के लागला होता. त्यानंतर 2008 पासून तोंडी परीक्षा सुरू झाल्यावर निकाल 87.41 टक्के लागला. यंदाचा कमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी झाली. विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झाले. आता योग्य गुणवत्तेच्या आधारावर योग्य दिशा दहावीलाच मिळू शकेल. – विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री

विभाग टक्केवारी
कोकण- 88.38
कोल्हापूर – 86.58
पुणे – 82.48
नाशिक- 77.58
मुंबई – 77.04
संभाजीनगर – 75.20
लातूर – 72.87
अमरावती – 71.98
नागपूर – 67.27

आपली प्रतिक्रिया द्या