राज्य कबड्डी संघटनेत अदृश्य “शक्तींचा” हात; ना वार्षिक सभेचा पत्ता, ना निवडणुकीबाबत घोषणा

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा कार्यकाळ संपून पाच महिने उलटून गेलेत पण अद्याप सर्वसाधारण वार्षिक सभेचा पत्ता नाही ना निवडणुकीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. संघटनेत अतिसक्रिय असलेले पदाधिकारी वशीलेबाजीमुळे “निष्क्रिय” होऊन बाहेर फेकले गेल्याचेही दिसतेय, तर त्यांच्या अनुपस्थितीत राज्य कबड्डी संघटना काही अदृश्य शक्ती चालवत असल्याचा आरोप संघटनेचे इमानदार कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे राज्य कबड्डी संघटना आणखी किती महिने “वाली” शिवाय चालणार, याचे उत्तर कुणाकडेही सापडत नाहीय.

सध्या नगर जिल्ह्यात जोशात 70 वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे यजमानपद जरी राज्य संघटनेला मिळाले असले तरी ही स्पर्धा नगर जिल्हा हौशी संघटनेच्या मेहनतीवर आयोजित केली गेली आहे. असे असताना या स्पर्धेला राज्याचा तगडा संघ निवडताना राज्याच्या काही वशीलेबाजांचे वाली असलेल्या पदाधिकार्‍यांनी गुणवान खेळाडूंवर अन्याय करण्याचा पराक्रम केला होता. असेच प्रकार सर्व गटांच्या संघनिवडीत केला गेल्याचेही “दबक्या” आवाजात बोलले जात आहे. वशीलेबाजांनी केलेल्या निवडीमुळे संघांची कामगिरी किती खालावलीय , ते आता कुणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. पण याचदरम्यान राज्य संघटनेत सुरू असलेला सावळागोंधळ संपविण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे असतानाही निवडणुकीच्या घोषणेसाठी आवश्यक असलेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेला तारीख पे तारीख पडतेय. वार्षिक सभेची तारीख जाहीर केल्यानंतर ती कोणतेही कारण न देता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्य संघटनेची निवडणूक केंद्रिय क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाने तयार केलेल्या आदर्श आचारसंहितेनूसार व्हायला हवी, पण संघटनेचे काही पदाधिकारी केवळ पळवाटा शोधण्यातच मग्न आहेत. राज्य संघटनेलाच आदर्श आचारसंहितेचे काही पडलेले नसल्यामुळे जिल्हा संघटनाही द्विधा मन:स्थितीत आहेत. खुद्द राज्य संघटनेनेच आदर्श आचारसंहितेचे पालन करून आपल्या घटनेत बदल करायला हवे होते, पण 10 वर्षानंतरही संघटनेला सुबुद्धी सुचली नाही. त्यामुळे जिल्हा संघटनांनीही राज्य संघटनेच्याच पावलांवर पाऊल ठेवत निवडणुका घेतल्या आहेत. कबड्डीच्या भल्यासाठी राज्य संघटनेची निवडणूक तात्काळ होणे गरजेचे आहे, पण कुणालाही याबाबत गांभिर्य नाही. कारण कबड्डीला कुणी आता “वालीच” उरलेला नाही, जो खंबीरपणे निर्णय घेईल. इथे फक्त कुणी एक स्क्रिप्ट लिहीतोय आणि त्यावर दुसर्‍याची स्वाक्षरी केली जातेय. सध्या सार्वत्रिक निवडणुकांचा काळ सुरू असल्यामुळे या हौशी संघटनेला पुढील अडीच-तीन महिने वाली मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अदृश्य शक्ती आणखी किती दिवस कबड्डीला आपल्या मुठीत ठेवेल, हे सांगता येणार नाही