महाराष्ट्र राज्य कबड्डी निवडणूक ; गजानन कीर्तिकर कार्याध्यक्ष, मंगल पांडे कोषाध्यक्ष


सामना ऑनलाईन । पुणे

गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांनी अनुक्रमे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्षपदीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी बाजी मारली. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. रविवार, 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या या दोन पदांकरिता निवडणूक घेण्यात आली. कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर व संभाजीनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांच्यात तर कोषाध्यक्ष पदाकरिता परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह मंगल पांडे व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांच्यात सरळ लढत होती.

या मतदानासाठी 25 संलग्न जिह्यांचे 74 प्रतिनिधी पात्र ठरले होते. त्यापैकी 71 सदस्यांनी मतदान केले. गजानन कीर्तिकर यांना 51 मते मिळाली, तर दत्ता पाथ्रीकर यांना 19 मते मिळाली. एक मत बाद झाले. 32 मतांनी कीर्तिकर कार्याध्यक्षपदी निकडून आले. मंगल पांडे यांना 47 मते मिळाली, तर रमेश भेंडीगिरी यांना 24 मते मिळाली. 23 मतांच्या फरकाने पांडे हे कोषाध्यक्षपदी निवडून आले.

बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी :

  • अध्यक्ष : अजितदादा पवार (पुणे).
  • उपाध्यक्ष : देवराम भोईर (ठाणे), अमरसिंह पंडीत (बीड), शशिकांत गाडे (नगर), दिनकर पाटील (सांगली).
  • उपाध्यक्ष (महिला राखीव) : शकुंतला खटावकर (पुणे), नेत्रा राजशिर्के (रत्नागिरी).
  • सरचिटणीस : आस्वाद पाटील (रायगड).
  • सहचिटणीस : रवींद्र देसाई (रत्नागिरी), मदन गायकवाड (सोलापूर), मोहन गायकवाड, महादेव साठे (धाराशीव).
  • सहचिटणीस (महिला राखीव) : सिय्यदा पटेल (नांदेड), स्मिता जाधव (परभणी).