विक्रम :राज्यात  दहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती

5
electricity

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या महानिर्मितीने आज विक्रमी वीजनिर्मिती केली. आधी ‘एमएसईबी’ आणि आता ‘महानिर्मिती’ कंपनी झाल्यापासून प्रथमच महानिर्मितीने दहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा टप्पा ओलांडला आहे. वीज प्रकल्पांमध्ये वेळोवेळी केलेली देखभाल दुरुस्ती, पुरेसा कोळसा आणि मुबलक पाण्यामुळे महानिर्मितीने आज तब्बल 10 हजार 34 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती करून ‘महावितरण’ला पुरवली आहे.

तापमानाचा पारा वाढल्याने राज्याची विजेची मागणी 19 हजार 500 मेगावॅटवर पोहचली आहे. ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने आपल्या औष्णिक वीज प्रकल्पातून 7 हजार 577 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली असून जलविद्युत प्रकल्पातून 2100 मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातून 270 मेगावॅट, तर सौर प्रकल्पातून 119 मेगावॅट वीजनिर्मिती करत दहा हजार मेगावॅटचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंतची ही रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती ठरली असून नुकतीच 14 मे रोजी 9 हजार 500 मेगावॅट एवढी वीज निर्मिती झाली होती.

 मुंबईची मागणी साडेतीन हजार मेगावॅटवर

‘महानिर्मिती’ने वीजनिर्मितीत सर्वोच्च पातळी गाठलेली असतानाच आज मुंबईतही उन्हाळ्यातील सर्वाधिक 3 हजार 527 मेगावॅट एवढी मोठी मागणी नोंदली आहे. याआधी ऑक्टोबर हीटमुळे ऑक्टोबर 2018 मध्ये 3600 मेगावॅट एवढी मागणी नोंदली होती.  

मेरिट डिस्पॅच ऑर्डनुसार प्राधान्य

‘महावितरण’ मेरिट डिस्पॅच ऑर्डरनुसार म्हणजे ज्यांच्या विजेचा दर कमी त्यांची वीज प्राधान्याने घेते. त्या पार्श्वभूमीवर महावितरणची वीज सध्या स्वस्त दरात मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करण्यास वाव मिळत असल्याचे महानिर्मितीचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या