राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यांतील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कमी गुणवत्ता आणि शाळांची घसलेली पटसंख्या या कारणास्तव राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. डिसेंबर महिन्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. या घसरलेल्या पटसंख्येमुळे याबाबत शिक्षण विभागाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. सरकराच्या या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारा असल्याचे मत शिक्षणक्षेत्रात व्यक्त होत आहे.

कोकणातील जवळपास ५०० शाळा या निर्णयामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पुणे जिल्ह्यातील ७६ शाळांचा समावेश आहे. सुमारे तेराशे शाळांमध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या १० पेक्षाही कमी आहे. त्यामुळे अशा शाळांमध्ये शिक्षक येत नाहीत. कमी गुणवत्तेमुळेच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

नजीकच्या भागात जिल्हा परिषदेची शाळा उपलब्ध नसल्यास अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले आहे. पटसंख्या कमी असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळपासच्या सरकारी किंवा खाजगी शाळेत प्रवेश मिळणार आहे. या शाळांच्या तीन किलोमीटर परिसरातील अन्य शाळांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याने शिक्षण हक्काचा भंग होणार नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.