२५ वर्षांनी ‘त्यांची’ पुन्हा एकदा शाळा भरली

सामना ऑनलाईन । वांगणी

शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २५ वर्षांनी एकत्र येत महात्मा फुले विद्या मंदिर, वांगणी येथील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला अनोखी भेट दिली. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आठवण म्हणून २ इन्व्हर्टर झेंडावंदनासाठी स्टेपअप दिले. माजी विद्यार्थ्यांच्या या कृतज्ञता मेळाव्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी भारावून गेले होते.

महात्मा फुले विद्या मंदिर, वांगणी या हायस्कूलला २०१६ मध्ये ५० वर्ष पूर्ण झाली, शाळेने सुवर्णमहोत्सव साजरा केला. तेव्हा पासून १९९२ च्या एसएस बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेसाठी आपण कृतज्ञता म्हणून काही तरी करायला हवे असे वाटत होते. ४-५ विद्यार्थ्यांनी मिळून व्हॉट्स अॅप ग्रुप बनवून इतर आपल्या सहाध्यायींचा शोध चालू झाला. पण कामधंद्यांच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक विद्यार्थ्यांना त्या वेळी एकत्र करणे शक्य झाले नाही पण शेवटी १९९२ च्या बॅचला देखील २५ वर्ष पूर्ण झाल्याने आम्ही काही विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना अखेर संपर्क साधला. सर्वांना आनंद झाला. म्हणून एकत्र येण्याची तारीख रविवार ४/२/२०१८ ठरली. त्याप्रमाणे सर्व मुले-मुली वर्गणी काढून शाळेसाठी मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी भेट देण्याचे ठरले मग शाळेच्या गरजेनुसार कॉम्प्युटर रूम मध्ये आणि प्रोजेक्टर रूम मध्ये असे २ इन्व्हर्टर आणि २६ जानेवारीला नवीन ठिकाणी झेंडावंदन साठी सेटअप उभारणे त्याप्रमाणे अशी मदत २६ जानेवारी २०१८ रोजी केली.

मग ४ फेब्रुवारीच्या स्नेह-मेळाव्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू झाली सर्वप्रथम त्यावेळच्या सर्व शिक्षकांना संपर्क साधून त्यांना येण्यासाठी विचारले त्यांना आमच्या एकत्र भेटण्याचा हेतू सांगितल्यावर खूप आनंद झाला. कारण आमचे भेटणे हे केवळ मौजमजेसाठी एकत्र येण्याचे नव्हते तर ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले त्याचे पुनर्स्मरण करणे आणि आपण जगासमोर एक सुसंस्कृत नागरिक म्हणून नावारूपाला येणे हा हेतू होता.

त्याप्रमाणे वांगणी येथील दौलत बाग या फार्म वर रविवार दि ४/२/२०१८ रोजी ९ ते ५ या वेळेत कार्यक्रम पार पडला. ९०% विद्यार्थी आणि जवळपास सर्व शिक्षक उपस्थित होते सर्वप्रथम २ तास सर्वजण एकमेकांना भेटले. ११ वाजता औपचारिक कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रत्यक्षात शाळेतील घंटा वाजवून प्रार्थना झाली गुरुब्रम्हा…जण गण मन… आणि हीच आमुची प्रार्थना म्हणून २५ वर्षानंतर पुन्हा एकदा प्रौढ झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनाच्या वातावरणात घेऊन गेले. प्रार्थना झाल्यावर १९९२ च्या हजेरी क्रमांकानुसार त्याच वर्गशिक्षका सौ. देशपांडे मॅडम यांनी हजेरी घेतली.

त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांने हजेरी क्रमांकानुसार आपले मनोगत व्यक्त केले. आपले मनोगत व्यक्त प्रत्येकजण मोकळेपणाने बोलत होता. त्यानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षकांनी विदर्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले प्रत्येकाने एवढे यश प्राप्त केले नसले तरी प्रत्येक जण आपल्या भूमिकेत सर्वोत्तम असला पाहिजे. प्रत्येक शिक्षकाने विध्यार्थ्यांनी त्यांची आठवण केली म्हणून संतोष मानत होते. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा अंधश्रद्धा मानू नका व्यसनापासून दूर रहा अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हाचे मुख्याध्यापक श्री. वायदंडे सर यांनी आपले जीवन केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी ठेवा, तसेच गणित शिकवणारे कर्पे सर यांनी भावूक होऊन सांगितले की, तुमच्या बॅचला मला एकच वर्ष शिकवायला मिळाले याची खंत वाटते त्यांनी २५ वर्षा पूर्वीच्या आमच्या वर्गाच्या आठवणींना उजाळा दिला आणि तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा त्याला जे व्हायचे ते होऊ द्या आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू नका अशाप्रकारे श्री. गायकवाड सर, श्रीमती अभ्यंकर मॅडम, श्री चौधरी सर, धानके सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर तेव्हाच्या वर्गशिक्षका सौ. देशपांडे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि तळमळीने विद्यार्थ्यांकडून त्यांच्या जीवन विकासासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यानुसार त्यांनी तयार केलेला संकल्प विदर्थ्यांना दिला.

समारोपाचा कार्यक्रम सर्वांनी शाळेत जाऊन आपल्या त्यावेळच्या १०वी च्या वर्गात बसून केला. त्यावेळी शाळेचे चेअरमन श्री. शंकर शेलार हे उपस्थित होते शाळेला बॅच कडून घेतल्या गेलेल्या भेटींचे औपचारिक अर्पण केले. त्यानंतर श्री. शेलार यांनी बॅचच्या कृतज्ञभावाचे कौतुक केले आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची समाप्ती झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र विशे यांनी केले तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंगेश काळे, सचिन शेलार, अविनाश भोईर, विद्याधर पालांडे, रविंद्र विशे, उल्हास विशे यांनी विशेष मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वी केला.