केरळ व तामिळनाडूमध्ये गांधी आंबेडकरांच्या पुतळ्याची नासधूस

सामना ऑनलाईन । कोची

देशात पुतळ्यांच्या तोडफोडीचे लोण पसरत चालले असून आज सकाळी केरळमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. तामिळनाडूत देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. या दोन्ही घटनांवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

केरळ मधील कन्नूर शहरातील थलिपरंबा भागात महात्मा गांधींचा पुतळा आहे. या पुतळ्यावर दगडफेक करत त्या पुतळ्यावरील चष्मा तोडण्यात आला. यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

बुधवारी रात्री उशिरा तामिळनाडूतील चेन्नई शहरातील तिरुवाटीय्यूर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी रंग फेकून या पुतळ्याची नासधूस केली. सकाळी जेव्हा हा प्रकार उघडकीस आला त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेत आहे.