फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा! : गुलाबराव पाटील

4

सामना प्रतिनिधी । जळगाव

महाराष्ट्रातील समाज क्रांतीच्या गंगोत्रीचा उगम महात्मा फुले यांच्या घरातुन झाला असून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्व समजासमोर आहेत. फुले दाम्पत्याचे कार्य देशव्यापी होते. फुले दाम्पत्यास येत्या 26 जानेवारीपुर्वी ‘भारतरत्न’ सन्मान मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस स्वरूपात शिफारस आणि पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी प्रत्यक्ष भेटून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी निश्चितच पुर्ण होईल अशी ग्वाही दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. फुले दांपत्याला ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडुन मागील 3 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुंबई येथे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ सन्मान देण्यात यावा बाबतचे पत्र प्रत्यक्ष भेतीअंती दिले.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संबंध जीवन हे समाजक्रांतीचे प्रतीक आहे. स्वराज्य हे शेवटी सुराज्यासाठी असले तरी या देशातील आर्थिक आणि सामाजिक विषमता ही घालवावी लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल याची जाणीव फुले दाम्पत्याने महाराष्ट्राला करून दिली आहे. माणसानेच माणसांवर झालेल्या अमानुष विरुद्ध त्यांनी लढा पुकारला. फुले दांपत्याला जाऊन 100 हून अधिक वर्ष झाली आहेत. फुले दाम्पत्याने शेतकरी महिला जातीभेद आणि शैक्षणिक सामाजिक जनजागृती केली आहे त्यामुळे या प्रश्नावर त्यांची भूमिका समजून घेऊनच पुढे जावे लागते. या दाम्पत्याची समकालीनांनी उपेक्षा केली आहे. तशीच अपेक्षा आजच्या काळात शासनाकडुन होऊ नये अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे व प्रत्यक्ष चर्चा करून सहकार राज्यमात्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच फुले दाम्पत्यास ‘ भारतरत्न’ सन्मान 26 जानेवारी 2019 पूर्वी मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करून पाठपुरावा करावा अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.