बिल थकल्याने महावितरणने पाणी योजनेची वीज तोडली

सामना ऑनलाईन । खर्डी

लाखो रुपयांचे बिल थकल्याने महावितरणने शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून खर्डीत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नळांना पाणी येत नसल्याने खर्डीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून येथील ग्रामस्थ मोटरसायकल, जीप, रिक्षा व टँकरने १६ किलोमीटर अंतरावरून मोडकसागर धरणावरून पाणी आणत आहेत. या पाणीटंचाईचा फायदा व्यापारीही उचलत असून चढय़ा दराने बाटलीबंद पाणी विकले जात आहे.

खर्डीला पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला होणारा वीजपुरवठा कमी दाबाने व वारंवार खंडित होत असल्याने खर्डीतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यात आता शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ८ ते १० लाखांचे वीजबिल थकवल्याने खर्डी पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी महावितरण कंपनीने तोडली असल्याचे शहापूरचे सहाय्यक अभियंता अविनाश यांनी सांगितले.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
खर्डीत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाचा प्रयत्न महावितरण व पाणीपुरवठा विभाग करत आहेत. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शाखाप्रमुख अनिल मडके, उपसरपंच सचिन जाधव, फारूख मेमन यांनी दिला आहे.