महेश भिंगारकर ‘रायगड श्री’ चा मानकरी

सामना प्रतिनिधी । पनवेल

कामोठे येथे रायगड जिल्हा अजिंक्य शरीरसौष्ठव स्पर्धेत महेश भिंगारकर यांनी ‘रायगड श्री’चा किताब पटकावला. 51 हजार रुपये, मानाचा पट्टा व चषक देऊन भिंगारकर यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी जिह्यातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.  रायगड बॉडी बिल्डर्स ऍण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने ‘रायगड श्री 2019’ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, रिपाइंचे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत उपस्थित होते.