तिन्हीसांजेला घराघरात अवतरणार विठूमाऊली!

सामना ऑनलाईन । मुंबई

तिन्हीसांज म्हणजे दिवे लागणीची वेळ, लक्ष्मी यायची वेळ, एकंदरीत महाराष्ट्रीयन घरात ही खूप महत्वाची वेळ. येत्या ३० ऑक्टोबरपासून तिन्हीसांजेला महाराष्ट्रातल्या घराघरात विठूमाऊली अवतरणार आहेत. महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलावर आधारित नवी मालिका ‘विठूमाऊली’ स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.

सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची कोठारे विझन या मालिकेची निर्मिती करत आहेत. या मालिकेतून लोकोध्दारासाठी अवतार घेतलेल्या विठ्ठलाची महती दाखवली जाणार आहे. तसेच विठ्ठलाचं रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी असलेलं नातंही उलगडणार आहे. एक आगळेवेगळे पौराणिक कथानक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे. आता विठ्ठल भक्तांना तिन्हीसांजेला विठूदर्शन घडणार आहे.

आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर स्टार प्रवाहने या मालिकेची घोषणा केली होती. मराठी टेलिविझनवर विठ्ठल पर्वाची सुरुवात कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्ताजवळ होणार आहे. विठूमाऊली या मालिकेची घोषणा झाल्यापासून केवळ टेलिविझन इंडस्ट्रीतच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रात उत्सुकता आहे. त्यासाठी आता थोडेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, दररोज तिन्हीसांजेला विठूदर्शन होणार असल्यानं महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण होणार हे नक्की!