महाराष्ट्राच्या ‘भाईं’ना भेटा मोठ्या पडद्यावर

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. तमाम महाराष्ट्रात भाई अशी ओळख असलेल्या पुलंच्या अनेक अजरामर साहित्यकृतींवर आत्तापर्यंत अनेक नाटकं, चित्रपट झालेत. पुलंच्या काही चाहत्यांनी त्यांच्या कलाकृतींवर एकपात्री प्रयोगही सादर केले आहेत. पण, आता पुलंचा जीवनपट मोठ्या पडद्यावरून रसिकांसमोर येणार आहे. निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आहे.

‘फाळकेज् फॅक्टरी’ या नावाची नवी कंपनी महेश मांजरेकर यांनी सुरू केली असून या बॅनरखाली तयार होणाऱ्या पहिल्यावहिल्या सिनेमाची घोषणा त्यांनी नुकतीच केली. ‘भाई… व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी ८ नोव्हेंबर २०१८ या पुलंच्या जन्मदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचंही मांजेरकर यांनी जाहीर केलं आहे.

साध्या साध्या प्रसंगांतून विनोद फुलवत, व्यक्तींमधल्या वल्ली शोधत पु. ल. देशपांडे यांनी आपल्या सरस आणि सकस साहित्याने मराठी माणसाचं आयुष्य समृद्ध केलं. लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक , अभिनेते असं बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले पुलं म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं रत्न होते. त्यांच्यावर चित्रपट येणार म्हणून तमाम वाचक आणि पुलंवर भरभरून प्रेम करणारा त्यांचा चाहतावर्ग मनोमन सुखावला आहे, हे निश्चित.