मराठी ‘बिग बॉस’ महेश मांजरेकर

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदीमध्ये छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी पंसती मिळालेला आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला कार्यक्रम ‘बिग बॉस’ मराठीत येणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. हिंदी ‘बिग बॉस’ लोकप्रिय होण्याचं मोठं कारण कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान देखील आहे. त्यामुळे मराठी बिग बॉसलाही तेवढ्याच ताकदीचा होस्ट मिळणे गरजेचे होते, त्यानुसार बिग बॉसच्या टीमचा शोधही सुरू होता. मात्र त्यांची शोध मोहीम आता थांबली असून मराठी बिग बॉस महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मराठी सिनेसृष्टीत महेश मांजरेकर यांचं मोठं नाव आहे. सलमान खानने बिग बॉसल्या एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे, ती किमया महेश मांजरेकर यांना साधता येईल का? हे लवकरच कळणार आहे. याआधी मराठी बिग बॉससाठी रितेश देशमुख, ‘बिग बॉस’ सीजन ११ची विजेती शिल्पा शिंदे यांची नावं चर्चेत होती. मात्र आता महेश मांजरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सगळ्या चर्चा बंद झाल्या आहेत. मराठी ‘बिग बॉस’चं शूटिंग लोणावळ्याला होणार आहे.