महाराष्ट्र नं.१

नितीन फणसे, [email protected]

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीत पहिलं पारितोषिक मिळालं ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्राचा भगवा राजधानीत…

महाराजांनी अटकेपार झेंडा रोवून महाराष्ट्र ते आग्रा, दिल्ली आणि सगळ्या प्रांतात फडकवला होता. तोच झेंडा हिंदुस्थानच्या राजधानी दिल्लीत मानाने फडकत होता तो पाहून ऊर भरून आला. महाराजांना मानाचा मुजरा करता आला याचा अभिमानही वाटला. त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. महाराज रयतेचा राजा म्हणून ओळखले जायचे. त्यांचा भगवा दिल्लीत फडकताना पाहिला तेव्हा मन भरून आलं, असंही नितीन देसाई म्हणाले.

महाराष्ट्राचा गौरव आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा चित्ररथ यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर सादर करण्यात आला. देशातून अनेक चित्ररथ आलेले असतानाही आपल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिलं पारितोषिक मिळालं ही प्रत्येक मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. हा चित्ररथ ज्यांच्या कला दिग्दर्शनाने सादर झाला तो मराठमोळे नितीन देसाई यांच्या मेहनतीने…

आपल्या चित्ररथाविषयी नितीन देसाई भरभरून बोलले. ते म्हणाले की, अशा प्रकारचा चित्ररथ करायचं महाराष्ट्र शासनाने जेव्हा ठरवलं तेव्हा खरं तर मला शिवाजी महाराजांची सेवा करायची संधी मिळाली. कारण लहानपणापासून आपण महाराजांच्या प्रतापाच्या कथा वाचतो, ऐकतो तेव्हा आपलं रक्त उसळून येतं. दिल्लीसारख्या ठिकाणी महाराजांचं चरित्र साकारायची संधी मिळणं किंवा महाराजांची सेवा करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं, असेही ते म्हणाले.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर केवळ हिंदुस्थानातील लोकांनीच नव्हे, तर संपूर्ण जगाने हा सोहळा पाहिला. त्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाची भव्यताही त्यांनी अनुभवली असेलच. महाराजांची न्यायव्यवस्था दाखवणारा तराजू गोलाकार फिरताना, त्यावर महाराजांचे मावळे, रायगडावर असलेली मेघडंबरी… त्याची प्रतिकृती चित्ररथावर बनवली होती. महाराजांचे ३२ मण सोन्याचं सिंहासन…

नितीन देसाई पुढे म्हणाले की, राजपथावर रथ आला तेव्हा ‘इंद्र जिमी जम्भ पर..’ हे कवी भूषण यांनी लिहिलेलं गाणं वाजलं तेव्हा त्यात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष झाला तेव्हा तर तेथे असलेले सगळेच भारावले होते. पंतप्रधान, राष्ट्रपती, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह जगातील दहा देशांचे राष्ट्रप्रमुखही त्यावेळी उपस्थित होते. त्यामुळे हा घोष दिल्लीतून जगभर दुमदुमला.