मराठमोळे दागिने

संध्या ब्रीद, [email protected]

शृंगार आणि आभूषणे… हे पक्कं समीकरण आहे… श्रावणोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने खास मराठमोळे अलंकार….

जग कितीही फॅशनेबल झालं असलं तरी मराठमोळय़ा दागिन्यांनी काही आपली जागा सोडली नाहीये. श्रावण मासाची सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर सुरू झाली आहे आपल्या आवडत्या सणांची शृंखला. श्रावणी सोमवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला हे सगळे सण आपण श्रावण मासात मोठय़ा आनंदाने साजरे करतो. आता सण साजरे करतो म्हणजे मराठमोळय़ा पारंपरिक दागिन्यांची गोष्ट तर आलीच. साहजिकच या सर्व सणांमध्ये आपला कल असतो तो मराठमोळय़ा दागिन्यांकडे आणि पेहरावाकडे. त्यातही प्रामुख्याने भर दिला जातो तो काठा पदराच्या साडय़ांना. आता साडय़ा नेसणे म्हणजे दागिने तर आलेच. कारण मराठमोळे अलंकारच तुमच्या साडीची आणि प्रामुख्याने तुमची शोभा आणखीन वाढवतील यात शंका नाही. मग या आज आपण चर्चा करूया अशाच मराठमोळय़ा दागिन्यांची.

मंगळसूत्र..सौभाग्यालंकार आणि सवाष्णीचे लेणे म्हणून ओळखल्या जाणाऱया मंगळसूत्राला श्रावण मासात फारच महत्त्व असते, मात्र नोकरदार स्त्रीया तसंच इतर स्त्रीया सोन्याचं भरगच्च मंगळसूत्र चोरीला जाऊ नये म्हणून लहानशी सर घालतात. मात्र आता त्या लाँग पॅटर्नचे काळय़ाभोर मण्यांचे मंगळसूत्र पोत ज्याला छानस भरगच्च पेंडंट असेल, घालून मोठय़ा दिमाखाने आपल्या मराठमोळय़ा तोऱयात मिरवू शकतात.

गळय़ातील विविध अलंकार

कोल्हापुरी माळ ..मंगळसूत्राबरोबरच तुम्ही जर कोल्हापुरी साजदेखील घातला तर तुमचा मराठमोळा ठसका दिसल्याशिवाय राहणार नाही. एक सरीचा, दोन पदरी, तीन पदरी किंवा चार पदरी कोल्हापुरी साज अलीकडे बाजारात सहज मिळतात जे घालून तुम्हीही तुमचा मराठमोळा ठसका दाखवू शकता.

चोकर..ठसठशीत मराठी तोरा दाखवायचा असेल तर लांबसडक मंगळसूत्राबरोबरच चोकर घालायला विसरू नका. हे तुम्हाला वेगवेगळय़ा डिझाईन्समध्ये मिळतील. जसं की मण्यांचे चोकर, अर्धचंद्रकोर चोकर, बेलपानांचे चोकर.

वज्रटिका…ठुशी किंवा चोकरसारखाच एक अलंकार म्हणजे वज्रटिका. जो घातल्यानंतर तुमचा मराठमोळा ठसका लोकांना नक्कीच भुरळ पाडेल.

जोंधळी पोत ..केवळ साडीच नव्हे तर तुम्ही पंजाबी ड्रेस, स्कर्ट टॉप, मिडी किंवा कुर्ता इत्यादी पेहरावांवर जोंधळी हार घालून तुमच्या सौंदर्यात भर पाडू शकता.

 बोरमाळ..नऊवारी साडी अगर काठापदराची गोल नेसल्या जाणाऱया साडीवर घातली जाणारी बोरमाळ आता फॅशन सेगमेंट झाली आहे. सर्व प्रकारच्या मॉडर्न फॅशनेबल ड्रेसवर गळय़ापर्यंत लोंबणारी बोरमाळ घालून तुम्ही फक्त मराठी ठसकाच नाही तर फॅशनेबल आणि मॉडर्न ब्लोही देऊ शकता.

पुतळी हार..पुतळी हारदेखील तुम्ही साडीबरोबरच सर्व प्रकारच्या मॉडर्न कपडय़ांवर घालू शकता.

कर्णभूषण..मराठमोळय़ा अलंकारांमध्ये सध्या झुमक्यांचं चलन जास्त दिसून येतं. त्याचबरोबर कर्णफूल, कुडय़ा आणि कानाची वेल यासारखे कर्णाभूषण घालून तुमचं सौंदर्य निराळंच दिसेल.

नाकातील नथ किंवा चमकी..मराठमोळय़ा पेहरावावर तुम्ही जर नथ किंवा नाकातली चमकी घातली नाही तर तुमचा शृंगार नक्कीच अपुरा वाटेल. म्हणूनच आता बाजारात वेगवेगळय़ा व्हरायटीच्या नथी उपलब्ध आहेत. जसं की कारवारी नथ, मराठा पद्धतीची नथ, ब्राह्मणी पद्धतीची नथ, सरजाची नथ, पेशवेकालीन नथ आणि नाक टोचलं नसल्यास दाबाची नथही बाजारात उपलब्ध आहे. मात्र ‘नोकरदार स्त्रीया ऑफिसमध्ये किंवा बाहेर जाताना जर नथ घालू शकत नसतील तर त्या नाकामध्ये चमकी घालू शकतात. तुम्ही सोन्याची, चांदीची, मोत्याची किंवा अमेरिकन खडय़ाची कोणतीही चमकी घालू शकता.

ठुशी..पहिला श्रावण मंगळवार. मंगळागौरी पूजन करताना अस्सल मराठमोळय़ा पेहरावाबरोबरच पारंपरिक दागिने घातले असल्यास त्यामध्ये ठुशीचीही भर द्या. भरगच्च दागिन्यांबरोबरच गळय़ाला लागू असलेली वज्रटिका ठुशी, बेलपान ठुशी आणि ठुशी तुमच्या मराठमोळय़ा सौंदर्याला उजळवून टाकेल.

बांगडय़ा..मराठमोळय़ा पेहरावावर तुम्ही जर बांगडय़ा घातल्या नाही तर तुमचं सौंदर्य अर्धवटच म्हणावं लागेल. पाटल्या, जवमनी बांगडय़ा, कडे, डिझायनर बांगडय़ा इत्यादी घालून तुम्ही तुमच्या हाताची शोभा तर वाढवालच शिवाय तुमचं सौंदर्यही उठून दिसेल.