मणिपूरच्या घटनेवर अण्णा हजारे यांचा संताप; केंद्र सरकारला लिहिणार पत्र

मणिपूरमध्ये जमावाकडून दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही घटनेबाबत संताप व्यक्त केला असून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेचा निषेध करत आपण केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहोत, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

अण्णा हजारे म्हणाले की , मणिपूरची घटना निंदनीय आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रिला मातेचा मान आहे. त्यामुळे मातेची अशी विवस्त्र धिंड काढणाऱ्या नराधमांना फासावर लटकविले पाहिजे. या घटनेवर केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे. आपल्या देशात महिलांवर असे अत्याचार होत असतील तर ही गोष्ट योग्य नाही. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीच दिली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

दिल्लीत निर्भयावर अन्याय झाला होता, तेव्हा मी एक वर्षाहून अधिक काळ मौन व्रत केले होते. यातील आरोपांना फाशीची शिक्षा द्या, अशी मी मागणी केली होती. ज्या दिवशी आरोपींना फाशीची शिक्षा झाली, त्याच दिवशी मी मौन व्रत सोडले होते, असेही हजारे यांनी सांगितले. मणिपूरच्या घटनेतील एका महिलेचे पती सैनिक आहेत. जो सैनिक आपल्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहे, त्याच्या पत्नीवर असा अन्याय होणे योग्य नाही. एक स्त्री आमची बहीण-आई आहे, तिच्यावर असा अत्याचार होणे हे गंभीर आहे. या घटनेकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष वेधणार आहोत. केंद्र सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत योग्य ती कारवाई करण्याची मागणीही हजारे यांनी केली आहे.