अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर अज्ञातांकडून विषप्रयोग? रुग्णालयात दाखल केल्याचा दावा

हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्यावर अज्ञातांनी विषप्रयोग केला असून त्याला उपचारांसाठी कराचीतील रुग्णालयात दाखल केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. अर्थात या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

दाऊद इब्राहिम याच्यावर तो घरात असतानाच विषप्रोयग झाला. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली असून त्याला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठला आहे. पाकिस्तान आणि हिंदुस्थानमधील अनेक सोशल मीडिया अकाऊंटवर तर दाऊदचा मृत्यू झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

‘द फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिम कराचीतील कोणत्या रुग्णालयात असून तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झालाय याचे रहस्य कायम आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक दावे केले जात असले तरी पाकिस्तान किंवा हिंदुस्थानच्या अधिकाऱ्यांनी या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. दाऊदची तब्येत अचानक बिघडली आणि यामागील कारण विषप्रयोग असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना अज्ञातांकडून ठार केले जात असल्याने संशय बळावत आहे.

दाऊद इब्राहिम याचा हिंदुस्थानच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून 1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाइंड आहे. यात 250 हून अधिक लोकांना आपला जीव गमावावा लागला होता, तर हजारो जखमी झाले होते.

हिंदुस्थानमधून फरार झाल्यानंतर दाऊद इब्राहिमला पाकिस्तानने शरण दिली होती. पाकिस्तानमधील कराचीमध्ये त्याचे वास्तव्य असून त्याच्या घराबाहेर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयएसचा पहारा असल्याचे अनेकदा समोर आले होते. दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलानेही यास दुजोरा दिला होता. जानेवारी महिन्यात त्याने दाऊद दुसऱ्या लग्नानंतर कराचीत रहात असल्याचे एनआयएला सांगितले होते.

दरम्यान, दाऊद गेल्या काही काळापासून आजारी असून त्याला चालताही येत नसून काठीचा आधार घ्यावा लागत होता. आता त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचेही वृत्त आहे.