केके रेंजसाठी जमीन संपादनात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

नगर शहराजवळील खारेकर्जुने येथील संरक्षण विभागाच्या ‘केके रेंज’मधील सुचित क्षेत्रातील 42 हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार असली, तरी शेतकऱयांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. तसेच याप्रकरणी तातडीने दिल्लीत बैठक घेणार आहे, असे आश्वासन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले.

लोणी प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त राजनाथ सिंह यांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर संरक्षणमंत्री बोलत होते.

नगर जिह्यातील राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यातील राज्य सरकारची 6028 एकर, वन विभागाची 13,958 एकर आणि खासगी 22,238 एकर जमीन यासाठी संपादित केली जाणार आहे. खासगी जमीन राज्य सरकारमार्फत संपादन केल्यास त्याची भरपाई दिली जाणार असली, तरी याला शेतकऱयांचा विरोध आहे. या संदर्भात बोलताना याबाबत दिल्लीत सर्वसमावेशक बैठक घेऊन तोडगा काढणार आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले.

संपादित क्षेत्रातील निर्बंध हटवावेत – सुजय विखे

n केके रेंजच्या विस्तारासाठी संपादित क्षेत्रातून निर्बंध हटविण्यात यावेत, अशी मागणी खासदार सुजय विखे-पाटील यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. केके रेंज क्षेत्रांतर्गत नगर जिह्यातील नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यातील 23 गावांतील 10798 हेक्टर शेतजमीन संपादित करण्यात येणार आहे. या संपादित जमिनीवरील सर्व निर्बंध हटवून शेतकऱयांना दिलासा द्यावा. निर्बंधांमुळे शेतकऱयांना कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बँकाही शेतकऱयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. नगर जिह्याला पाणीपुरवठा करणाऱया मुळा धरणाचाही या भागात समावेश आहे. युद्ध सरावामुळे या धरणाच्या सुरक्षिततेला बाधा येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.