येवल्यात भीषण अपघात; १० ठार, १५ जखमी

सामना ऑनलाईन । येवला

येवला-मनमाड रोडवर रविवारी भीषण अपघात झाला. क्रुझर जीप आणि व्हॅनचा हा अपघात इतका भयानक होता की यात १० प्रवासी जागीच ठार झाले तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. क्रुझर जीपमधील प्रवासी घरगुती कार्यक्रम आटोपून धुळ्याला परतीच्या प्रवासाला निघले होते.

रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास येवला-मनमाड रोडवर एका मोटारबाईकला वाचवण्यासाठी बाजूने रस्ता काढण्याच्या तयारीत असलेल्या क्रुझर जीपची समोरून येणाऱ्या व्हॅनवर इतक्या जोरात धडक बसली की व्हॅन आणि क्रुझरमधील १० प्रवासी जागीच ठार झाले तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. क्रुझरमधील प्रवासी हे धुळ्याचे असून ते साखरपुड्याहून परतीच्या प्रवासाला निघाले होते. जखमी प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटलेली नसल्याने त्यांच्याविषयी माहिती मिळवणे कठीण झाले आहे. मृत आणि जखमींमध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे.

मृतांची नावे -आदित्य मरसाळे (वय -१२), महेश दिलीप राव (वय-४२, रा. पाशीपुल, अण्णाभाऊ साठेनगर, धुळे), यश महेश राव (वय १०), ओम्नीचालक संजय हरी सोनवणे (वय ३२ रा.अयोध्यानगर,मनमाड), निशांत मनोज तिवारी (वय-२३, इटावा,ता.बरकनर,जि.बाकेनार) तसेच आशुतोष तिवारी यांची पत्नी. इतरांची ओळख अद्याप समजू शकली नाही.

असा झाला अपघात…
क्रूझर जीप मध्ये १६ ते १७ प्रवाशी होते. कोळपेवाडी त कोपरगाव येथून साखरपुडयाचा कार्यक्रम आटोपून वराकडील मंडळी धुळ्याकडे चालली होती. क्रूझरच्या मागून येऊन पल्सर ने क्रूझरला ओव्हरटेक केले. ओव्हरटेक अतिशय खेटून केल्याने क्रूझरच्या चालकाने करकचून ब्रेक दाबले. त्यात वेग जास्त असल्याने क्रूझरचे पुढचे चालक बाजूचे टायर फुटले. अन क्रूझरने मनमाड कडून शिर्डी कडे जाणाऱ्या मारुती ओम्नी व्हॅनला जोरात धडक दिली. त्यावरच धुळे येथून पुणे जाणाऱ्या धुळे – पुणे बसने धडक दिली. मात्र बसचा वेग त्वरित आटोक्यात आल्याने बसमुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी क्रूझर व ओमनीच्या धडकेत या दोनही वाहनातील प्रवासी बाधित झाले.