लाखांदूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, नदीत खड्डे खोदून नगरिक भागवितात तहान

98

सामना ऑनलाईन । लाखांदूर

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना चुलबंद नदी पात्रात खड्डे खोदून दूषित पाणी भरण्याची वेळ आली आहे. प्रशासनाचे मात्र या तीव्र पाणीटंचाईकडे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

लाखांदूर तालुक्यातील मडेघाट, चप्राड, परसोडीसह इतर गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. अनेक गावातील विहिरी आटल्या असून हातपंपसुद्धा बंद झाले आहेत. पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने शेवटी कोरड्या नदीत खड्डे खोदून पाणी काढावे लागत आहे. पाणी आणण्यासाठी अख्खे कुटुंब नदीपात्रात कसरत करतानाचे चित्र चप्राड येथे आहे. काही गावांमध्ये तर पाण्यासाठी रात्रीसुद्धा जागण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अतिरिक्त विहिरी आणि बोअर अधिग्रहण करण्याची मागणी होत आहे. तसेच वेळेवर टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. परंतु प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या