तीळगूळ घ्या गोड गोड बोला!

243

मीना आंबेरकर

वर्षाचा पहिला सण… मकर संक्रांती… स्निग्धता, गोडवा, खमंगपणा या वैशिष्टय़ांसह…

इंग्रजी कालगणनेत प्रथम येणारा हिंदुस्थानी सण म्हणजे मकरसंक्रांत. हिंदुस्थानात सर्वत्र हा सण उत्साहाने साजरा केला जातो. अर्थात सण साजरा करण्याच्या पद्धतीत फरक असेल, परंतु परस्परातील प्रेमाची भावना जोपासणारा हा सण आहे. या सणात तीळ आणि गूळ हे आहारातील महत्त्वाचे पदार्थ. त्यातील तीळ हे स्नेहाचे व गूळ हे गोडीचे प्रतीक म्हणूनच संक्रांतीचा सण हा स्निग्ध आणि मधूर स्वभाव विशेषाची जोपासना करणारा सण आहे. हा सण थंडीच्या दिवसात येतो व त्यावेळी शरीराला स्निग्धतेची व उबदारापणाची आवश्यकता असते आणि ही शरीराची गरज तीळ व गूळ या दोन गोष्टींमुळे पूर्ण होते. त्यामुळे आरोग्यदृष्टय़ा हा सण फार महत्त्वाचा आहे. या सणाला तीळ व गूळ यापासून बनवलेले पदार्थ करण्याची पद्धत आहे. तसेच या काळात विपुल येणाऱया भाज्यांचाही समावेश असतो. यादृष्टीने या सणाचा प्रासंगिक मेन्यू ही त्यादृष्टीने ठरवला जातो. बघूया तर या सणाला तयार केल्या जाणाऱया पदार्थांच्या पाककृती.

tilgul-2

तिळाचे लाडू

साहित्य… चार वाटय़ा तीळ, तीन वाटय़ा बारीक चिरलेला गूळ, एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचे कूट, चार चमचे साजूक तूप, एक वाटी किसलेले सुके खोबरे, 2 चमचे वेलची पूड.
कृती...खोबरे खमंग भाजून घ्यावे. तीळ खमंग भाजून घ्यावेत. गुळात अर्धी वाटी पाणी व तूप घालून गुळाचा पाक करावयास ठेवावा. गूळ चांगला विरघळून पाकाला एक आला म्हणजे भांडे खाली उतरावे आणि त्यात तीळ, खोबरे, शेंगदाणा कूट, वेलची पूड घालावी. मिश्रण सारखे करून त्याचे हवे त्या आकाराचे लूड वळावे. तिळगूळ घ्या व गोड बोला.

jaggery-2

गुळाची पोळी

साहित्य...चार वाटय़ा किसलेला चांगल्या प्रतीचा पिवळा गूळ, सहा वाटय़ा कणिक, अर्धी वाटी तीळ भाजून कुटून, वेलची पूड 2 टे. स्पून, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, एक वाटी तेल. तांदळाची पिठी एक वाटी.

कृती … कणकेमध्ये चवीपुरते मीठ व अर्धी वाटी तेल गरम करून घालावे. कणिक घट्ट भिजवावी. गूळ किसणीने बारीक किसून घ्यावा. डाळीचे पीठ तेलावर चांगले बदामी रंगावर भाजावे. गुळात डाळीचे पीठ, कुटलेले तीळ, वेलची पूड घालावी व गूळ चांगला मळावा. पोळीकरिता कणकेच्या दोन गोळय़ा कराव्या. त्यापैकी एका गोळीपेक्षा थोडी मोठी गुळाची गोळी करावी. कणकेच्या दोन गोळय़ांमध्ये गुळाची गोळी ठेवून पातळ पोळय़ा लाटव्या व भाजाव्या. लाटताना गूळ कडेपर्यंत पसरला जाईल हे पाहावे.

bhaji-final

भोगीची भाजी

साहित्य... पाव किलो मोठी वांगी, पाव किलो बटाटे, पाव किलो गाजर, पाव किलो वालपापडी, दोन शेवग्याच्या शेंगा, 1 वाटी पावटय़ाचे दाणे, 1 वाटी मटारचे दाणे, 1 मोठा कांदा, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला, 2 टे. स्पून पांढरे तीळ भाजून कुटून, 2 टे. स्पून सुक्या खोबऱयाचा किस भाजून कुटून, दोन डाव तेल, थोडी चिंच कोळून, चवीनुसार मीठ व गूळ.

कृती ...वांग्याचे मोठे तुकडे करावेत. गाजराचे मोठे तुकडे करावेत. वालपापडी निवडून चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरावा. पातेलीत मोहरी, हिंग, हळद घालून खमंड फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा व त्यात वांग्याचे तुकडे बटाटय़ाचे तुकडे, गाजराचे तुकडे घालावेत. मटारचे व पावटय़ाचे तुकडे, गाजराचे तुकडे घालावेत. शेवग्याच्या शेंगांचे सोलून दोन इंचाचे तुकडे करून घालावेत. पातेलीवर पाण्याचे झाकण ठेवून भाजीला दोन वाफा द्याव्यात. चिंचेचा कोळ, मीठ, गूळ, लाल तिखट, काळा मसाला, कुटलेले तीळ व खोबरे घालावे. दोन वाटय़ा पाणी घालावे. भाजी शिजेपर्यंत उकळू द्यावी. भाजीला अंगासरशी रस असावा.

kachori-22

तिळाची कचोरी

साहित्य... तीळ, हरभरा डाळीचं पीठ, कोथिंबीर, मिरच्या, मैदा, रिफाइंड तेल, मीठ, साखर.
कृती...दोन वाटय़ा मैद्यामध्ये मुटका वळेपर्यंत कडकडीत तेल व किंचित मीठ घालून मैदा घट्ट भिजवावा. त्याचे सुपारीएवढे गोळे करावेत. (आतलं सारण) एक वाटी तीळ भाजून कूट करावा. एक वाटी डाळीचे पीठ तेलावर खमंग भाजून घ्यावं. दीड वाटी कोथिंबीर बारीक चिरावी. सात-आठ मिरच्याचा ठेचा करावा. थोडय़ा फोडणीत ठेचा व कोशिंबीर चांगली परतून मंद वाफ आणावी. त्यात तिळाचं कूट घालून ढवळावं. अदमासे मीठ व चवीपुरती साखर घालावी. पाण्याचा हबका मारून मंद वाफ आणावी व सारण उतरवावं. दोन छोटय़ा पातळ पुऱया लाटाव्या. एक पुरीवर सगळं सारख सारण पसरावं. त्यावर दुसरी पुरी ठेवून सर्व बाजूंनी कडा बंद कराव्यात व कातण्यानं कातून नक्षी करावी. रिफाइंड तेलात कचोरी खमंग, खरपूस तळून काढावी.

आपली प्रतिक्रिया द्या