संक्रांत… पोंगल… लोहडी…

प्रशांत येरम

संक्रांत संपूर्ण हिंदुस्थानात साजरी केली जाते. तिचे स्वरूप जरी वेगवेगळे असले तरी गोडवा तोच असतो….

हिंदुस्थानी संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच हिंदुस्थानी परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना दिवशी तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या, गोडगोड बोला’ असे म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते.

हिंदुस्थान देश हा विविधतेने नटलेला आहे. येथे त्या त्या ठिकाणच्या पर्यावरणाला अनुसरून तिथे तिथे ते ते सण साजरे केले जातात. मकर संक्रांतही याला अपवाद नाही. कारण यावर पर्यावरण जरी अवलंबून नसले तरी पर्यावरण ज्याच्यावर अवलंबून आहे अशा सूर्याशी तो निगडीत आहे. सध्या मकर संक्रांत १४ जानेवारीला येत आहे. काही वर्षांनंतर ती १५ जानेवारीला येईल.

हिंदुस्थानी उपखंडातच मकर संक्रांत हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. एकाच दिवशी साजरा होत असूनही त्या सणाची नावे मात्र खूपच वेगळी आहेत.

महाराष्ट्रात मकर संक्रांत किंवा संक्रांत म्हणतात. तीळ आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या वडय़ा किंवा लाडू यांची देवाण-घेवाण करतात. हिंदुस्थानी संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरूष काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान करीत असतात. १४ जानेवारीला सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. संक्रांतीपासून सूर्य मकरराशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे.

महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी आणि दुसऱया दिवशी किंक्रांत असते. स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात व देवाला तीळ, तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यपण लुटतात. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असल्यामुळे शरिरात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, हरभरे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करावयाचा असतो.

कर्नाटकातही हा सण जवळपास महाराष्ट्रासारखाच साजरा होतो. उसाची सुगी झालेली असते. सफेद तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबऱयाचे काप आणि गुळाचे खडे यांचे वाण सुपातून नेतात. त्यात कधी बत्तासे, उसाचे करवे असेही पदार्थ ठेवले जातात. तसेच ते एकमेकांना देता ‘एल्लू बेळ तिंडु झोल्ले मातंडी’ म्हणजे ‘तिळगूळ खा चांगलेच बोला’ असं म्हणतात.

गुजरात आणि राजस्थानमध्ये हाच सण ‘उतराण’ किंवा ‘उत्तरायण’ म्हणून साजरा होतो. तिळगुळाची चिकी बनवली जाते. या दिवसांत सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळे घालून मिश्र भाजी किंवा उंधीयू बनवला जातो. इतकेच नव्हे तर पतंग उडवण्याचा मोठा जल्लोष असतो. जणू काही पतंगाच्या मार्गानं शर्यतच लागलेली असते ती जणू सूर्यापर्यंत पोहोचायचेच आहे.

तामिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेला येतो. तो तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो. त्यानंतर दुसऱया दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱया दिवशी घरातील पशुधनाची पूजा केली जाते. पोंगलच्या दिवशी स्नान करून अंगणात मातीच्या नव्या भांडयात खीर बनवली जाते. त्याला पोंगल असे म्हणतात. पंजाबामध्ये लोहडी म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते. शीखांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा उत्सव आहे. मकरसंक्रांतीच्या एक दिवस अगोदर लोहडी साजरी केली जाते. घरात नुकतीच सून आली असल्यास किंवा पहिला मुलगा झाला असल्यास या लोहडीचे महत्त्व काही वेगळेच असते. दिवसभर मुले या लोहडीच्या तयारीत व्यस्त असतात. रात्री एका ठिकाणी होळी पेटवली जाते. तेथे सगळे कुटुंब जमा होते. मग या अग्नीची पूजा केली जाते. त्याभोवती प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर प्रसाद वाटला जातो. प्रसादामध्ये तीळ, गजग, गूळ, शेंगदाणे व मक्याच्या लाह्या यांचा समावेश असतो.

गोवा, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरांचल, मणिपूर या सगळ्या प्रांतांमध्ये ‘मकर संक्रांत’ मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते, तर हरयाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये तिला ‘माघी’ म्हणतात. काश्मीरमध्ये ‘शिशुर सैंक्रांत’ म्हणतात. तामिळनाडूत त्याला ‘पोंगल’, नेपाळमध्ये ‘तरुलोक- माघी’, थायलंडमध्ये ‘सोंगक्रान’, लाओसमध्ये ‘पि-मा-लाओ’, म्यानमारमध्ये ‘थिंग्यान’ तर कंबोडिआमध्ये ‘मोहा संक्रांत’, आसाममध्ये ‘माघी बिहु’ किंवा ‘भोगाली बिहु’, उत्तर प्रदेशमध्ये ‘खिचडी’, दक्षिणेकडील प्रांतांमधूनही हा सण साजरा होतो. आंध्र प्रदेशात हा सण चार दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱया दिवशी पेट्टा पांडुगा तिसऱया दिवशी कणुमा आणि शेवटच्या दिवशी मुक्कनुमा अशी संक्रांत चार दिवस साजरी होते.