काळय़ा रंगाचा सोहळा

287

रोहिणी निनावे 

काळा रंग अभिमानाने मिरवणारा एकमेव सण मकरसंक्रांत… एरवी काळा म्हणून नाक मुरडणारे काळी चंद्रकला तोऱ्यात मिरवतील. शेवटी Black is Beautiful.

सौंदर्याचं लक्षण
काळा रंग सौंदर्याचं लक्षण आहे.. कजरारे नैना, काली जुल्फे, कारे बादरवा असं आणि बरंच काही शायरीच्या शब्दकोशातले परवलीचे शब्द आहेत.. पण ही कल्पना शायरीतच उरते.. म्हणतात ना दिल बहलाने के लिये गालिब ये खयाल अच्छा है… तसं काहीतरी!

देवही काळाच…
आपण देव मानतो ते कृष्ण आणि राम हेही सावळ्या रंगांचेच होते, पण त्यांना स्वतःला कधी याचं दुःख नव्हतं, कुणी यावर काही म्हटलेलंही नाही, उलट कृष्णाच्या सावळ्या वर्णावर कितीतरी काव्ये लिहिली गेलीयत.. चित्रपटातही वारंवार याचा उल्लेख येतो!.. कृष्णाला श्याम… सांवरे… घननीळ… अशीच किती नावे आहेत. एवढय़ा गोपिका श्याम वर्णाच्या कृष्णावर फिदा होत्या. त्या काय उगाच… देव माझा विठू पण सावळाच की आहे!

मनस्वी ऋतू
थंडीत काळ्या रंगाची वस्त्रं परिधान केली की ती उष्णता शोषून घेतात आणि शरीराला ऊर्जा देतात, हे कारण कसं पटण्यासारखं होतं, पण त्यातही हा उपचार एकाच दिवसाचा..! हल्ली थंडी म्हणावी तर थंडी नाही… पाऊस असावा तेव्हा पाऊस नाही. ऋतूला कसला धरबंद उरला नाही, मनस्वी झालाय तो..! तसेच काळ्या रंगाबाबतचे विचार माणसांनीच मनस्वी होऊन ठरवलेत असं वाटतं..!

…म्हणून पांढऱ्याला महत्त्व
काळ्या रंगाचं महत्त्व मुळातच हे की काळा रंग आहे म्हणून पांढऱ्या रंगाचं महत्त्व आहे… जसा रात्रीचा अंधार काळा आहे म्हणून दिवसाच्या लख्ख उजेडाचं महत्त्व आहे.

मकर संक्रांत म्हटली की आठवतात तिळाचे लाडू, हलवा, बाळाचं बोरन्हाणं, उंच उंच उडणारे पतंग… आणि आवर्जून घातल्या जाणाऱ्या काळ्या साडय़ा..! संक्रांत हा सण म्हणजे शुभ दिन… संक्रमणाचा दिन… मग त्या दिवशी काळी साडी कशी चालते..? लहान बाळालाही काळा फ्रॉक घालतात, काळी तीट लावतात, काजळ लावतात, काळा दोरा घालतात, जर अशुभ असेल, चांगला नसेल तर मग काळा रंग कुणी दृष्ट लागू नये म्हणून का वापरला जातो..? तर त्यावर म्हणे उत्तर हे की काळोखाचा अंत झाला… आणि प्रकाशाची सुरुवात झाली… दुःख सरलं आणि सुखाची नांदी झाली… याचं प्रतीक म्हणून काळ्या साडय़ा नेसल्या जातात…

काळ्या रंगाबद्दल आधीच अढी आहे आपल्या समाजात.. खरं तर वर्ण हा काही कुणाच्या हातात नसतो. पण सावळ्या माणसाची हवी तशी थट्टा केली जाते… अंधारात याचे फक्त दातच दिसतात… कितीही साबण लावला तरी कावळा गोरा होणार नाही… हो, त्यावरून आठवलं… काळ्या कावळ्याने पिंडाला स्पर्श केल्याशिवाय आप्तांचे आत्मे तृप्त होत नाहीत… या काळोखात चोऱ्या होतात, पाप होतं म्हणून काळोख बदनाम.. पण हल्ली दिवसा उजेडीही गुन्हे होताहेत…
याच मखमली अंधारात चंद्र उजळून येतो… अंधाराची काळी शाल पांघरून प्रेमाला उधाण येतं… प्रेमीजनांचा तर हा काळा अंधार सखाच आहे…! … ज्या मातीत आपला जन्म झाला तीसुद्धा काळी, आणि जे अक्षर आपल्याला साक्षर करतं तेही काळंच!

मुलींसाठी काळा रंग जणू काही शापच मानला जातो.. तिच्या मोठय़ा होण्याआधी तिचं लग्न कसं होणार याबद्दल आई वडिलांची चिंता सुरू होते… आमच्या ओळखीत एक मुलगी आहे श्वेता… मुलगी सावळी पण तरी रेखीव, तेजस्वी, चॉकलेटी डोळे… अतिशय हुशार… चटपटीत पण आईवडिलांना मात्र तिची काळजी होती… काकू म्हणाल्या, हिचं लग्न कसं होणार याची चिंता पडली आहे… सावळी आहे, आम्ही आईवडील म्हणून सावळी म्हणतो खरं तर काळीच… आजही मुलांना गोरी मुलगी हवी असते… गोरी मुलगी म्हणजे सुंदर ही कल्पना आजही आहे हिंदुस्थानात! मी म्हटलं, काकू असं समजणाऱया मुलाशी श्वेताचं लग्न न झालेलंच बरं… तुम्ही मुलींचा रंग बघता की गुण? काकू म्हणाल्या, हे तू म्हणते आहेस. पण बाकीच्यांचं काय? काळा रंग आहे म्हटल्यावर मुलं नाकं मुरडतात… मी म्हटलं आणि मुलगा काळा असला तर मात्र मुलीने काही बोलायचं नाही. आरशात पाहून मला वाटायला लागलं आपण कुरूप आहोत की काय? शाळेत कॉलेजमध्ये ही तीच स्थिती… फक्त थट्टा आणि उपहास… सावळ्या मुलींमध्ये या अशा लोकांच्या वागण्यामुळे न्यूनगंड निर्माण होऊ शकतो पण तुझ्यात नाही झालाय.. आणि व्हायलाही नको… जस्ट प्रूव्ह की ब्लॅक इज ब्युटीफुल.. आणि त्यावर ती ब्युटीफुल हसली!! गोऱ्या रंगाची माणसं काळ्या मनाची नसतात असं थोडंच आहे..? एखादी गोरी व्यक्ती वाईट स्वभावाची तर एखादी काळी व्यक्ती मनाने उज्ज्वलही असू शकते.

आमच्या ओळखीत एक गृहस्थ आहेत, त्यांना काळ्या रंगाबद्दल भलतंच वावडं आहे… ते काळे कपडे घालत नाहीत, काळ्या रंगाची गाडी वापरत नाहीत… एवढाच काय ऑफिसमध्येही त्यांनी सर्वांना तंबी दिली आहे, काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. त्यांच्या घरी जायचं असेल की चुकूनही काळे कपडे घातलेले त्यांना चालत नाहीत.. आणि जर तुम्ही काळे कपडे घालून त्यांच्या पुढय़ात गेलात तर ते तुमच्या समोरही येत नाहीत..! अर्थात ज्याची त्याची (अंध) श्रद्धा!.. पण काकांचे केस अजूनही काळे आहेत, भुवया काळ्या आहेत.. त्याचं काय? नशीब त्यांनी केस, भुवया लाल किंवा पांढऱ्या करून घेतल्या नाहीत.

काळाप्रमाणे काळ्या रंगाबद्दलचे हे गैरसमज दूर होताहेत. हल्ली पार्टीजमध्ये काळा हा सर्वात लोकप्रिय रंग आहे. तरुण पिढीचा आवडता रंग आहे तो..! स्मिता पाटील, नंदिता सेन, काजोल, प्रियांका, बिपाशा या सगळ्या डस्की ब्युटीजच आहेत. त्यांचा रंग त्यांच्या उत्कर्षाच्या आड आला नाही. पी. टी. उषा, पी. व्ही. सिंधू यांच्यासारख्या जगविख्यात खेळाडूंच्याही!
तेव्हा काळा रंग अशुभ असतो ही आख्यायिका मानून आपण सर्रासपणे काळ्या रंगाचं आणि काळ्या वर्णाचेही स्वागत करावं.. कारण ब्लॅक इज ब्युटीफुल!!

 

आपली प्रतिक्रिया द्या