Food Tips – उन्हाळ्यात घरच्याघरी झटपट बनवा ‘ही’ सरबतं, शरीर ठेवतील थंड

दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. उन्हामुळे शरीराची लाही अशावेळी थंडगार कोल्डड्रिंक्स पिण्याचा मोह होतोच. पण घशाला थंडावा देणारे हे कोल्डड्रिंक शरीरासाठी मात्र घातक असतात यामुळे ते न पिता त्याऐवजी घरी बनवलेली सरबतं किंवा मिल्कशेक प्यावेत. यासाठी घरच्याघरी  झटपट बनणारी ही काही सरबत…

लिंबु पुदिना सरबत  –

साहित्य:-
लिंबं – 10
साखर – अडीच कप
पुदिना – एक वाटी
आलं – एक इंच

कृती –

साखरेमध्ये पाऊण कप पाणी घालून पाक तयार करून घ्या. लिंबाचा रस काढून घ्या, आलं आणि पुदिना लिंबाचा थोडा रस घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या, पाकामध्ये लिंबाचा रस घाला, पुदिन्याची पेस्ट घाला, आणि सर्व मिश्रण गाळुन बाटलीमध्ये भरून ठेवा, बाटली फ्रीज मध्ये ठेवा.. जेव्हा सरबत प्यायचे असेल तेव्हा एक ग्लास तयार सरबतामध्ये सात ग्लास थंड पाणी घालून सरबत सर्व्ह करा. कधीही पटकन तयार होणारे सरबत जरूर बनवून ठेवा.

juice
कैरीचे सरबत –

साहित्य –
कैरीच्या फोडी – अर्धा कप
साखर – अर्धा कप
पाणी – एक कप
एक चमचा खसखस – भिजवलेली
मिरची – एक
काळं मीठ – चवीप्रमाणे

कृती –

पातेल्यात अर्धा कप साखर घ्या , एक कप पाणी घाला उकळवून घ्या, साखर विरघळल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. मिक्सरमध्ये अर्धा कप कैरीच्या फोडी जरुरी प्रमाणे पाणी घालून चांगले बारीक करून घ्या, कैरीची पेस्ट एका बरणीत भरा, एक चमचा लिंबाचा रस घाला, त्यात साखरेचे मिश्रण घाला एक चमचा भिजवलेली खसखस घाला एक मिरची आक्खी घाला, बर्फ घाला चवीप्रमाणे काळे मीठ घाला, बरणीला झाकण लावून चांगले हलवून घ्या(शेक करा), सर्व्ह करा.

mango
खजूर मिल्क शेक –

साहित्य –
दूध – दोन कप
खजूर – साधारणपणे बारा
काजू – तीन ते चार
वेलदोडे – दोन

कृती –

खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा. काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्या. मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या. आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्समधून फिरवा. शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या. तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा

किवीचे सरबत –

साहित्य –
किवी – दोन
साखर – एक चमचा किंवा आवडी प्रमाणे
काळं मीठ – चवीप्रमाणे
मिरे पूड – चिमूटभर
भाजलेले जिरे – पाव चमचा

कृती –

किवी सोलुन घ्या, मिक्सर मध्ये किवीचा गर थोडे पाणी व जिरे सोडून इतर साहित्य घालून बारीक करा, यामध्ये थंड पाणी व जिरे घालून सर्व्ह करा.

kivi